पनवेल ः रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत कोन-सावळे रस्ता काँक्रिटीकरणासाठी 20 कोटी रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन शनिवारी (दि. 1 जानेवारी) सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
सोमाटणे पेट्रोलपंप या ठिकाणी हा सोहळा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून उरण विधानसभा मतदारसंघात येणारा कोन-सावळे रस्ता अत्यंत खराब झाला असून वाहनचालक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य शासनाकडून या रस्त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आमदार झाल्यानंतर महेश बालदी यांनी सर्वप्रथम या रस्त्याकडे विशेष लक्ष दिले. या संदर्भात त्यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार या रस्त्याचा विकास केंद्रीय रस्ते विकास निधीतून होणार आहे. अशा प्रकारे भाजप, केंद्र सरकार व आमदार महेश बालदी यांनी चालक आणि प्रवाशांना नववर्षाची सुखद भेट दिली आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …