Breaking News

बँकांनी स्वयंसहाय्यता समूहांना पाठबळ द्यावे -डॉ. हेमंत वसेकर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

सर्व बँकर्सनी ग्रामीण भागातील बचत गटांना कर्ज वितरण करताना संवेदनशील दृष्टीकोन जागृत ठेवायला हवा, असे प्रतिपादन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राज्य कक्षाने नवी मुंबई कार्यालयात राज्यातील सर्व सार्वजनिक, खासगी व सहकारी क्षेत्रातील बँकर्सच्या राज्यस्तरीय प्रमुखांची विशेष कार्यशाळा आयोजित केली होती. राज्यातील स्वयंसहायता समूहांना योग्यवेळी पतपुरवठा उपलब्ध करणे, खाते उघडणे, समूह सदस्यांना विमा सुरक्षा कवच उपलब्ध करणे इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.

राज्यातील सर्व बँकर्स सोबत आयोजित चर्चासंवादात बँकांनी केलेल्या कामगिरीबाबत बँकनिहाय सारासार विचार केला गेला. कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांनी सादरीकरण केले. तसेच प्रत्येक बँकेची उद्दिष्ट व साध्य, बँकांचा प्रादेशिक विभागनिहाय दृष्टीकोन, भविष्यातील नियोजन आणि उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या बँकांसाठी प्रोत्साहन कार्यक्रम याविषयी माहिती दिली.

एचडीएफसी बँकेने पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल बँकेला अभियानाकडून गौरविण्यात आले. एचडीएफसी बँकेने त्यांनी अंगिकारलेल्या कार्यपद्धतीबद्दल अन्य बँक प्रमुखांना माहिती देण्यात आली. याच कार्यशाळेत बँक ऑफ इंडियासोबत ग्रामीण बचत गटांना अल्पदराने पतपुरवठा करण्याबाबत सामंजस्य करारही करण्यात आला. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या वतीने राजेश देशमुख यांनी राज्यातील सर्व बँका महिला स्वयंसहायता समूहांना सर्वप्रकारे सकारात्मक मदत करतील, असे सांगितले.

या वेळी अभियानाचे उपसंचालक डॉ. राजेश जोगदंड, अभियान व्यवस्थापक कावेरी पवार, प्रमुख बँकांचे अधिकारी, प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply