नवी मुंबई : प्रतिनिधी
देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नेरूळ गावदेवी रिक्षा चालक-मालक संघटना आणि ठाणे जिल्हा ऑटोरिक्षा टॅकशी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या उपस्थितीत नेरूळ सेक्टर 20 रेल्वे स्टेशन येथे मास्क वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
नेरूळमधील रिक्षा चालक, मालक, वाहतूक पोलीस अधिकारी तसेच स्टेशनवरून येणार्या जाणार्या प्रवाशांना मोफत मास्क वाटप करण्यात आले. या वेळी माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी आपल्या भाषणात कोरोना संपला असे समजून काही लोकांनी मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त फिरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे अशा पद्धतीच्या चुका केल्याने अचानक कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुन्हा नागरिकांना जागरूक करण्याची गरज आहे. रिक्षाचालकांनीदेखील प्रवाशांना मास्क घालण्यास सांगावे किंवा मास्क न घातलेल्या प्रवाशांना मोफत मास्क द्यावे, असे सांगितले.
या वेळी माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते शेखर भोपी, नकुल म्हात्रे, गणपत भोपी, देवा म्हात्रे, अक्षय पाटील, संघटनेचे सरचिटणीस विकास सुर्यवंशी, उपाध्यक्ष प्रसन्न कडू, राजेश पाटील, नवी मुंबई आरटीओ प्रतिनिधी सचिन शेलार, सोमनाथ म्हात्रे आदी उपस्थित होते.