Breaking News

गुंतवणूक जीवन विम्यापेक्षा वेगळी का आहे?

-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com

जानेवारीपासून अनेक जण करबचतीचा विचार करतात आणि त्यासाठी जीवनविमा काढतात. त्यातून करबचत होत असली तरी दीर्घकाळ विमा हप्ता भरण्याची बांधिलकी घेतली जाते. ज्या जीवनविम्यातून पुरेसा परतावा मिळत नाही त्याला गुंतवणूक म्हटले जाते, पण गुंतवणूक ही जीवनविम्यापेक्षा वेगळी आहे आणि ते याच काळात समजून घेतले पाहिजे.

जानेवारी महिना म्हटला की, पहिला आठवडा हा शुभेच्छा व नव्या वर्षासाठीचे संकल्प वजा निर्धार करण्यात जातो. त्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या आकर्षक व महागड्या दैनंदिनी अथवा रोजनिशी घेण्यात अनेकजण वाढीव उत्सुकता दाखवतात. तशीच उत्सुकता नव्या वर्षातील आर्थिक अर्थसंकल्प म्हणजेच वैयक्तिक अथवा आपल्या कुटुंबासाठीचं एक गुंतवणूक बजेट पक्कं करावयास हवं जेणेकरून आपलीच आर्थिक उद्दिष्टं गाठण्यासाठी ते उपयोगी ठरेल. नोकरवर्गाची या महिन्यात लगबग सुरू होते ती म्हणजे आपल्या कंपनीस आपली गुंतवणूक माहिती देण्यासाठी तर काही जणांसाठी हे शेवटचे तीन महिने असतात आपल्या करबचतीचं उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी. आजच्या लेखात आपण काही खास प्रमुख करबचत गुंतवणूक पर्याय व त्यातील ‘वैशिष्ट्यं’ पाहू.

नव्याची नवलाई झाल्यावर आता हळूहळू करबचतीसाठी पर्याय धुंडाळले जातील, परंतु संक्रांतीस जसं सूर्याचं संक्रमण होतं, तसा आजचा हा लेख वाचून येणारा 14 जानेवारीचा दिवस सर्व गुंतवणूकदारांच्या विचारांसाठी नक्कीच एक संक्रमण ठरू शकेल.

अनेक इन्शुरन्स कंपन्या विविध आकर्षक नावाखाली अनेक प्रकारच्या योजना आणत असतात व गुंतवणूकीचा गंध नसलेले तरुण व इन्व्हेस्टमेंटचा इसेन्स (खरी चव) न चाखलेले प्रौढदेखील या स्कीम्सच्या मायाजालात अलगद ओढले जातात. त्याचा अतिरेक इतका पहावयास मिळतो की, माझ्या अशीलांना त्यांच्या गुंतवणुकीबद्दल विचारल्यावर एलआयसी आहे ना आमची, असं उत्तर येतं. माझी हरकत या योजनांना नाहीय परंतु ’इन्शुरन्स म्हणजे गुंतवणूक नव्हे’ हे लक्षात घेऊन सुद्धा विविध क्लुप्त्यांद्वारे अनेक सल्लागार (मातब्बर एजंट्स) गॅरेंटीड रिटर्न्सच्या नावाखाली जणू अशा योजना आपल्या गळी उतरवू पहात असतात. याचं कारण त्यांनादेखील (याद्वारे) त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं असतं आणि म्हणूनच तुमच्या टॅक्सप्लॅनिंगची सर्वांत चिंता कोणास असेल तर ती व्यक्ती म्हणजे अशा इन्शुरन्स कंपन्यांचे एजंट्स. कारण अशा एका स्कीममध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास सुमारे 20-30 टक्के कमिशन मिळणार असतं. एक व्यावसायिक गुंतवणूक सल्लागार कधीच अशा ट्रॅडिशनल प्लॅन्समध्ये गुंतवणूक करायला तुम्हांस भाग पाडणार नाही, जरी त्याला त्यातून ढीगानं कमिशन मिळत असेल कारण त्याला तुम्हाला जास्त फायदा करून देण्यात जास्त इंटरेस्ट असतो आणि हाच फरक असतो इन्शुरन्स एजंट व एक विश्वासू गुंतवणूक सल्लागार या मधला. त्यामुळं तुमचा विमा असावा ही तुमच्याबद्दलची त्यांची सजग काळजी नसून त्यांच्या स्वतःचं फायनॅन्शिअल प्लॅनिंग आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावं. अनेकदा टॅक्स कन्सल्टंट्स, चार्टर्ड अकाऊंटस अथवा नात्यातील कोणीतरी हे एजंट्स असतात आणि आपल्याला अलगद जाळ्यात ओढतात. अनेक इन्शुरन्स कंपन्या जानेवारी, फेब्रुवारी व मार्च (जेएफएम)साठी आपल्या एजंट्सकरिता अनेक योजना जाहीर करतात. ज्यामध्ये त्यांना अमूक एक रक्कम इन्शुरन्स प्रीमियम गोळा केल्यावर भरगच्च इन्सेन्टिव्ह मिळणार असतो. ज्याची रक्कम लाखांमध्ये असते अथवा सिंगापूरसारख्या टुरिस्ट डेस्टिनेशनच्या मोफत टूरचीदेखील घोषणा केली जाते आणि मग असे एजंट्स आपल्यासारख्या भोळ्या लोकांना टार्गेट बनवून आपलं उखळ पांढरं करून घेतात. म्हणूनच विमा करताना आपली नेमकी गरज जाणूनच विमा उतरावा. जसा की प्युअर टर्म प्लॅन, आरोग्यविमा, वाहनविमा, घर विमा इत्यादी. त्याचप्रमाणं आयुर्विमा व गुंतवणूक ह्या दोन वेगळ्या गोष्टी असून त्यांना त्याच प्रकारे हाताळावं. अनेकदा सांगितलं जातं की, पहिले अमूक एक वर्षच विम्याचा हफ्ता भरावा आणि नंतर मरेपर्यंत विमा राहील, वारंवार जरी ही गोष्ट मोहक भासली तरी पहिल्या ठराविक वर्षांमध्ये विमा कंपनीनं तुमच्या संपूर्ण हयातीचे प्रीमियम वसूल केलेलेच असतात आणि त्याच बदल्यात तुम्हाला आजीवन विमा दिला जातो. ह्या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी तुम्ही केवळ 60 वर्षांपर्यंत रेग्युलर आयुर्विमा योजनेचा प्रिमिअम किती आहे ते चेक करा आणि नंतर, 60 वर्षांपर्यंत प्रीमियम भरून नंतर आजीवन आयुर्विमा देत असलेल्या स्कीमचा प्रीमियम यांतील फरक तपासा.

आता अशा ट्रॅडिशनल इन्शुरन्स योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अथवा न करण्यासाठीची ठोस कारणे अशी-

1) एजंट कमिशन खूप जास्त असतं आणि ते तुमच्या गुंतवणूकीतूनच दिलं जातं. साहजिकच त्याचा परिणाम परताव्यावर होतो.

2) या योजनेत कमीतकमी पाच वर्षे गुंतवणूक करत राहावी लागते म्हणजे बांधिलकी.

3) लॉक-इन कालावधी पुढील 5-10 वर्षं म्हणजे एकूण 15 वर्षे. त्यामुळं तितकी वर्ष थांबायची तयारी असल्यास कोणताही चांगला इएलएसएस फंड (इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम) त्याच्या तुलनेत उत्तम परतावा देऊ शकतो. त्यामुळं जरी 10(10) डी चा करमुक्त परताव्याचा फायदा गृहीत धरल्यास इएलएसएस प्रकारच्या गुंतवणूकीतून निर्माण होणारी रक्कम बर्‍याच फरकानं जास्त असू शकते (अगदी दीर्घमुदत भांडवली कर विचारात घेऊन सुद्धा).

आता या योजना मुदतठेव योजना (एफडी) यांच्यापेक्षा परताव्याच्या बाबतीत नक्कीच उजव्या ठरतात, कारण पुढील पंधरा वर्षांत व्याजदर हे कमीच होत जाणार, कारण ती काळाची व अर्थव्यवस्थेची गरज ठरू शकेल आणि त्यामुळं त्या प्रमाणात बँकेतील मुदतठेवींचे व्याजदरदेखील उतरणार, परंतु या ट्रॅडिशनल योजनांचा अंतर्गत गृहीत धरलेला दर (आयआरआर) हा शेवटपर्यंत तितकाच राहील जो पॉलिसी घेताना नमूद केला असेल, त्यात बदल होणार नाही.

ज्या व्यक्तीस अजिबातच गुंतवणूक जोखीम पत्करायची नसल्यास अशा व्यक्तींसाठी कर वाचविण्यासाठी हा पर्याय बेहतर वाटू शकतो, तरी जग बुडण्याची भिती असतेच!

उदाहरणादाखल आपण इन्शुरन्स कंपनी कशी कार्य करते ते जाणून घेऊ.

एका नामवंत इन्शुरन्स कंपनीच्या नुकत्याच लाँच केल्या गेलेल्या एका आजीवन योजनेत एक तीस वर्षांची व्यक्ती दरवर्षी एक लाख रुपये, असे पुढील 10 वर्षे गुंतवणूक करते. त्यानंतर त्यापुढील पाच वर्षे वेटिंग पिरियड, म्हणजे एकूण 15 वर्षे लॉक-इन. कोणत्याही वर्षी पॉलिसीधारकाची मयत झाल्यास 10 लाखांचे विमाकवच. मग पंधराव्या वर्षी 1.5 लाख रुपये मिळणार व पुढील 54 वर्षे म्हणजेच त्या 30 वर्षीय व्यक्तीच्या त्याच्या वयाच्या 99 वर्षांपर्यंत दरवर्षी 1.15 लाख रुपये मिळणार व 99व्या वर्षी म्हणजे योजना संपताना पुन्हा 13 लाख रुपये मिळणार, म्हणजे एकूण भरणा रक्कम केवळ 10 लाख व एकूण परतावा रक्कम  76.60 लाख रुपये. वरवर पाहता ही योजना ’लई भारीच’ वाटते आणि तशीच भासवली जाते, परंतु वरीलप्रकारे भरणा केल्यास व वर उल्लेखलेले सर्वच्यासर्व पे-आऊट्स व आयुर्विमा देऊनसुद्धा योजनेशेवटी त्यापेक्षा भरपूर जास्त म्हणजे तब्बल एक कोटी 91 लाख रुपये परतावा मिळू शकतो, असं म्हटल्यावर एकतर लोक मला मूर्खात काढतील किंवा माझा पत्ता शोधत माझ्याकडं येतील, परंतु हे खरंच अगदी सहज शक्य आहे.

पहिली पंधरा वषेर्र् दरवर्षी 95 हजार (एक लाख वजा रुपये 5000 – हा 10 लाख आयुर्विम्यासाठीचा प्रतिवर्षीचा प्रीमियम)  ही रक्कम दरवर्षी केवळ 12 टक्के परतावा देईल असं गृहीत धरल्यास दहा वर्षांत ती रक्कम होते 18.67 लाख रुपयांनंतर ती रक्कम दरवर्षी 5000 रुपये वगळून पुढील पाच वर्षांसाठी केवळ आठ टक्के परतावा देणार्‍या इंडेक्स फंड किंवा इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवल्यास पुढील पाच वर्षांत ती रक्कम होते. 27.18 लाख रुपये. आता दरवर्षी 1.15 लाख रुपयं पे-आऊट व 5000 रुपये विमा हफ्ता असे 1.20 लाख वगळत उरलेली रक्कम केवळ 12 टक्के परताव्याच्या योजनेत पुढील 54 वर्षे गुंतवणूक चालू ठेवल्यास वयाच्या 60व्या वर्षीच (30 वय + 15 वर्षे लॉकइननंतर 15 वर्षांनी) ही रक्कम एक कोटी रुपयांचा टप्पा गाठते. तर 99व्या वर्षी ही रक्कम होते 44 कोटी 67 लाख 51 हजार 599 रुपये.

यामध्ये कोठेही अवास्तव परतावा गृहीत धरलेला नाहीय. अगदी सेन्सेक्सनं मागील 40 वर्षांत दिलेला परतावा (दरवर्षी 17 टक्के) गृहीत धरल्यास 191 कोटी रुपये होईल! आता विचार करा, उत्तम वेल्थ मॅनेजर किंवा उत्तम वित्तव्यवस्थापक हाताशी असल्यास केवळ एका योजनेद्वारे इन्शुरन्स कंपन्या किती नफा कमावू शकतात, म्हणून इन्शुरन्स योजनेत गुंतवणूक म्हणजे आपल्या स्वतःच्या फायद्यापेक्षा इन्शुरन्स कंपनीच्याच नफ्याचं प्लॅनिंग होत असतं व स्वतःपेक्षा जास्त त्यांच्याच नफ्यासाठी आपण गुंतवणूक करत असतो. अर्थातच, अनेक जण यावर विचार न करता सर्व सूत्र कोणा नावाजलेल्या कंपन्यांच्या हातात देऊ पाहतात त्यांना लखलाभ.अशा गुंतवणूकदारांसाठी अशा कंपन्यांकडं लाल गालिचा नेहमीच अंथरलेला असतो यात दुमत नाही.

अस्वीकृती : वरील लेख हा कोणासही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त अथवा कोणत्याही योजनेपासून परावृत्त करण्याच्या हेतूनं लिहिलेला नाही, फक्त गुंतवणूकदारांना जागरूक करण्याचा प्रयत्न आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply