Breaking News

13 जानेवारीला भूमिपुत्र परिषद, तर 24 जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन

पनवेल : प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी ‘दिबा’साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यांतील समस्त भूमिपुत्रांची 13 जानेवारीला भूमिपुत्र परिषद, तर 24 जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने शनिवारी  (दि. 8) पनवेल येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. पुन्हा एकदा एल्गार करण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे या वेळी अधोरेखित करण्यात आले असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढाई सुरूच राहणार असल्याची गर्जना करण्यात आली.
आगरी समाज मंडळाच्या महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेस समितीचे कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सरचिटणीस भूषण पाटील, माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, सहचिटणीस गुलाब वझे, संतोष केणे, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, खजिनदार जे. डी. तांडेल, सदस्य नंदराज मुंगाजी, रूपेश धुमाळ, दशरथ भगत, दीपक पाटील, विनोद म्हात्रे, विजय गायकर, जयेश आक्रे, भुवनेश्वर धनू, जितेंद्र म्हात्रे, गजानन मांगरूळकर, सुनील पाटील, डी. बी. पाटील यांच्यासह पनवेल, उरण, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण आदी विभागांतील प्रकल्पग्रस्त समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी पत्रकारांना माहिती देताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ते आजच्या पत्रकार परिषदेला येऊ शकले नाहीत. पुढे त्यांनी म्हटले की, पनवेल, उरण, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या प्रकल्पग्रस्तांच्या सर्व संघटना प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे अस्तित्व जपण्याचे काम करीत आहेत. भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांना काम देणे ही जबाबदारी सरकारची आहे. प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न आहेत. ते मार्गी लावण्याबरोबरच लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे ही सर्व भूमिपुत्रांची आग्रही आणि रास्त मागणी आहे. मागील वर्षी 10 जून, 24 जून आणि 9 ऑगस्टच्या आंदोलनानिमित्ताने लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने सारा भूमिपुत्र समाज एकवटला. लाखोंच्या संख्येने सहभागी झालेल्या भूमिपुत्रांची ताकद संपूर्ण भारताने पाहिली. आता ‘दिबां’च्या जन्मदिनी म्हणजेच 13 जानेवारी रोजी भव्य भूमिपुत्र परिषद पनवेल तालुक्यातील कोल्ही कोपर गावात दत्त मंदिराजवळ विमानतळ परिसरात आयोजित करण्यात आली आहे. आणि ही परिषद म्हणजे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या अस्मितेची, अस्तित्वाची आणि त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाची जाणीव करून देणारी आहे, तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे या मागणीसाठीची आहे.
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्यासाठीचा लढा उभा करताना रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर अशा विविध जिल्ह्यांतील भूमिपुत्र या ऐतिहासिक आंदोलनात सहभागी झाले. या सर्व भूमिपुत्रांचे जेथे राहतात तेथे वेगवेगळे संघर्ष आज उभे आहेत. त्यांच्या या संघर्षांमध्ये त्यांना सोबत करणे, त्यांच्या विषयांकडे शासनाचे लक्ष वेधून घेणे हीसुद्धा या लढ्याची जबाबदारी आहे आणि याच भावनेतून येत्या 13 जानेवारीला ही भूमिपुत्र परिषद होत आहे. या माध्यमातून आपल्या सर्व विषयांची उजळणी होणार आहे. हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारला अल्टिमेटम देण्यात येणार आहे. त्यानंतरच्या पुढील टप्प्याची माहिती देताना सांगण्यात आले की, राज्य सरकार भूमिपुत्रांच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करीत आहे. सिडकोचा ठराव रद्द करून नव्याने लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा ठराव करून राज्य सरकारला द्यावा आणि तो प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला द्यावा ही आग्रही मागणी सातत्याने भूमिपुत्रांकडून होत असतानाही त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम सिडको आणि ठाकरे सरकार करीत आहे. त्यामुळे 24 जानेवारीला विमानतळाचे सुरू असलेले सर्व काम बंद पाडण्यात येणार आहे, असा एल्गारही या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी समितीच्या वतीने जाहीर केला.

लोकनेते दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे ही भूमिका अनेकदा आंदोलन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत विषद झाली आहे आणि भूमिपुत्रांना काय म्हणायचे आहे हेही त्यातून स्पष्ट झाले आहे, मात्र सिडको आणि राज्य सरकार भूमिपुत्रांच्या न्यायिक भावनेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. जोपर्यंत ‘दिबा’साहेबांचे नाव विमानतळाला मिळत नाही तोपर्यंत हा लढा कायम असेल.
-आमदार प्रशांत ठाकूर, कार्याध्यक्ष, सर्वपक्षीय कृती समिती

भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे. ही नुसती लढाई नाही तर हक्क आहे. भूमिपुत्रांच्या परिषदेत स्थनिक, प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे ठराव मांडले जाणार आहेत. परवानगी आणि कोरोनाचे नियम पाळून ही परिषद होणार आहे.
-माजी खासदार संजीव नाईक, कार्याध्यक्ष, सर्वपक्षीय कृती समिती

‘दिबा’साहेबांचे नाव विमानतळाला मिळालेच पाहिजे आणि तो भूमिपुत्रांचा हक्क आहे. 23 जानेवारीपर्यंत सिडकोकडे वेळ आहे, नाहीतर विमानतळ काम बंद आंदोलन अटळ आहे.
-आमदार महेश बालदी, सदस्य, सर्वपक्षीय कृती समिती

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply