महाड ः प्रतिनिधी
कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. अशा परिस्थितीत उपाययोजना करणे आवश्यक असताना महाडमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सुरू केलेले कोविड केअर सेंटर बंद आहे. त्यामुळे रुग्णांनी जायचे कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाडमध्ये गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. विन्हेरे विभागातील न्यू इंग्लिश स्कूल या माध्यमिक विद्यालयात एकाच दिवशी 15 विद्यार्थी आणि दोन शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे केईएस या विद्यालयातदेखील काही विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. महाडमध्ये रुग्णसंख्या 100च्या वर गेली आहे. शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद केल्या असल्या तरी दैनंदिन व्यवहार सुरळीत असल्याने कोरोना संसर्ग अटकाव करण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. अशातच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने उभे केलेले कोविड केअर सेंटर लॉकडाऊन संपल्यानंतर बंद करण्यात आले. ते अद्याप सुरू झालेले नाहीत.
महाडमध्ये सुरवातीच्या काळात महाड ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर कार्यान्वित होते. या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार सुरू होते, मात्र स्थानिक नेतृत्वाला हे मान्य नव्हते आणि केवळ कारखानदारांच्या हट्टापाई राज्य सरकारने एमआयडीसीमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करून ग्रामीण रुग्णालयातील सेंटर बंद केले.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भावर कमी होत गेल्याने महाडमधील कोविड केअर सेंटरकडे दुर्लक्ष करण्यात आले, मात्र सध्या महाडमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना हे केंद्र सद्यस्थितीत बंदच आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने अनेक ठिकाणची कोविड केअर सेंटर सुरू केली आहे. मग महाडमधील सेंटर बंद का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
Check Also
रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष
रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper