खोपोली : प्रतिनिधी
करोनाच्या तिसर्या लाटेमुळे प्रशासन आता अॅक्शन मोडमध्ये आले असून, मास्क न लावणार्यांविरोधात कारवाई करण्याचे वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर खोपोली व परिसरात कार्यवाही केली जात आहे.
मास्क लावण्यावरून थोरवे बंधू सुरभी ज्वेलर्समधील गणेश नामक कर्मचारी आणि खोपोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर यांच्यात रविवारी किरकोळ वाद झाला. तो विकोपाला गेल्यानंतर अस्वर यांनी गणेश याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ज्वेलर्स असोसिएशनच्या व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेत या घटनेचा निषेध केला. सोमवारी सकाळी सुरभी ज्वेलर्स दुकानासमोर मोठ्या प्रमाणात व्यापारी व शिवसैनिक जमा झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली.
या वेळी ज्वेलर्स असोसिएशनने संबंधित अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी करीत खोपोली पोलीस ठाण्यास निवेदन दिले, तर आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगडचे पोलीस अधीक्षक व राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे दूरध्वनीवरून संबंधित अधिकार्यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी केली. त्यामुळे शासन नियमांचे पालन करण्यास सांगणार्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्वर यांच्याबाबत वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.