Breaking News

`अटल करंडक` स्पर्धेची नियोजन बैठक संपन्न

पनवेल : रामप्रहर वृत्तसंस्था
 श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी-स्वायत्त) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी 2021 मध्ये ’अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका’ स्पर्धा होणार असून या संदर्भात आज (शनिवार, दि. 26) नियोजन बैठक पार पडली.
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात महानगरपालिकेचे सभागृहनेते व  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या या बैठकीला सिने व नाट्य कलाकार भरत साळवे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत ब-हाटे, ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेवक संतोष भोईर, नगरसेविका रुचिता लोंढे, गंभीर दांडेकर, अमोल खेर, डॉ. राजेश येवले, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सत्यवान नाईक यांच्यासह इतर कलारसिक उपस्थित होते.
नाटय चळवळ वद्धींगत करण्यासाठी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावेत, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित झाले आहेत. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाटयरसिकांच्या गळयातील ताईत बनली.  यंदा या स्पर्धेचे सातवे वर्ष आहे. या स्पर्धेचा जास्तीत जास्त रसिकांना लाभ व्हावा, यासाठी कला क्षेत्रातील मंडळींचा स्पर्धेच्या नियोजनात सहभाग वाढविण्यासाठी हि बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्पर्धेच्या नियोजनाबाबत सखोल चर्चा झाली.

गेल्या सहा वर्षांपासून अटल करंडक स्पर्धा होत असताना या स्पर्धेला दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. दर्जेदार एकांकिकेची मेजवानी प्रेक्षक कला रसिकांना मिळावी यासाठी सातत्याने आमचा प्रयत्न राहिला आहे, म्हणूनच हि स्पर्धा राज्यस्तरावर नावाजली आहे. यंदा कोरोनाचा काळ असल्याने त्या संदर्भातील शासनाचे नियम पाळून स्पर्धा होणार आहे. 
– परेश ठाकूर, सभागृह नेते पनवेल महानगरपालिका
उपाध्यक्ष : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply