उरण : बातमीदार
तालुक्यातील केगाव ग्रामपंचायतीमध्ये जनतेची कामे वेळेवर होत नसल्याने, तसेच गेली तीन वर्षे ग्रामसभाच झाली नसल्याने व जनतेच्या समस्यांकडे केगाव ग्रामपंचायत जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने केगाव ग्रामपंचायतीविरुद्ध स्थानिक ग्रामस्थ, नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. जर या समस्या सुटल्या नाहीत, तर केगाव ग्रामपंचायतीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ, नागरिकांनी केगाव ग्रामपंचायतीला दिला आहे. केगाव ग्रामपंचायत हद्दीत अनेक समस्या आहेत, मात्र त्या समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतकडे वेळच नसल्याने त्या समस्या अनेक वर्षे तशाच आहेत. त्या समस्या सोडविण्याकडे ग्रामपंचायतचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. केगाव ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याची वाणवा असून या ग्रामपंचायतीतर्फे 15 ते 20 दिवसांनी तेही एकदाच पाणी सोडले जाते. पिण्याचे पाणीसुद्धा मिळणे नागरिकांना मुश्कील झाले आहे. पिण्याच्या पाण्याचे कोणत्याही प्रकारे नियोजन नाही. कोणत्याही वेळेत पाणी सोडले जाते. शिवाय पाण्याची पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी तात्पुरते रबर पॅच बांधले जाते. त्यामुळे पुन्हा पुन्हा पाईप फुटतो व हजारो लिटर पाणी वाया जाते. अनेक ठिकाणी वॉल्वसुद्धा उघडे आहेत. त्यावर झाकण नाहीत. त्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्याद्वारे, नाल्याद्वारे वाया जात आहे. या वॉल्व उघडे असल्याने पाणी घाण होते आणि तेच पाणी नागरिकांना पिण्याचे पाणी म्हणून सोडले जाते. यामुळे नागरिकांना विषबाधा होण्याची शक्यता आहे. वॉल्व फिरविण्यास, पाणी सोडण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला सांगितले जाते. त्यासाठी कोणतेही नियोजन नसते. स्थानिक ग्रामस्थांनी विविध समस्येंसंदर्भात ग्रामपंचायतीला कळवूनसुद्धा, तसेच अनेकदा निदर्शनास आणूनसुद्धा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक या विविध समस्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात, असा आरोप गावातील अक्षय पाटील, आतिष हुजरे, प्रवीण पाटील, मृणाल पाटील, प्रेरणा पाटील, विनोद पाटील आदींनी केला आहे.