कर्णधारासह सहा खेळाडूंना कोरोनाची लागण
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
सध्या सुरू असलेल्या अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. या स्पर्धेत खेळणार्या भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कप्तान यश धुलसह सहा क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाली आहे.
भारतीय संघ गुरुवारी (दि. 20) दुसरा सामना खेळला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात या सहा क्रिकेटपटूंना खेळवण्यात आले नाही. या सामन्यात निशांत सिद्धू संघाचा कर्णधार आहे. ‘क्रिकबझ’च्या बातमीनुसार, संघातील सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे सामन्यादरम्यान प्रशिक्षकांनाचा खेळाडूंसाठी मैदानावर पाणी घेऊन जावे लागले. यश धुल आणि उपकर्णधार राशिद यांच्या व्यतिरिक्त मानव प्रकाश, सिद्धार्थ यादव, आराध्या यादव आणि वासू वत्स क्वारंटाइन आहेत. त्यामुळे संघाची अवस्था बिकट आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी 17 खेळाडूंचा संघात समावेश करण्याची परवानगी दिली होती.
काही खेळाडू पॉझिटिव्ह खेळाडूंच्या संपर्कात आल्याचे एका सूत्राने सांगितले. या कारणास्तव खबरदारी म्हणून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. पुढील मोठ्या सामन्यापूर्वी संघाला कोणतीही जोखीम पत्करायची नाही. पहिल्या सामन्यात या संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारताने चार वेळा अंडर-19 वर्ल्डकप जिंकला आहे.