पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीतील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचे वर्ग 24 जानेवारीपासून सुरक्षितपणे सुरू होणार आहेत. यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 21) काढला असल्याने पनवेल महापालिका हद्दीतील सर्व शाळांची घंटा 24 जानेवारीला वाजणार आहे.
पनवेल महापालिका हद्दीत कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये यासाठी आयुक्तांनी महापालिका हद्दीतील इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळता अन्य पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग असलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा 5 जानेवारी 2022 पासून बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे पनवेल महापालिका हद्दीतील सर्व शाळा 24 जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश शुक्रवारी देण्यात आले. त्याशिवाय 15 ते 18 वर्षे वयोगटातील ज्या विद्यार्थ्यांचे अद्याप लसीकरण झालेले नाही. त्या विद्यार्थ्यांचे लसीकरण संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालिकेतील आरोग्य विभागाशी संपर्क साधून नियोजन करावे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड यांनी कोणत्याही क्षणी निर्बंध व शर्ती मध्ये वाढ केल्यास अशा वाढीव निर्बंधाचे ही पालन करावे, असे या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रातील शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेत पूर्व प्राथमिक ते बारावीचे वर्ग 24 तारखेपासून सुरू करण्याहे निर्देश देण्यात आले आहेत.