Breaking News

24 जानेवारीला विमानतळ काम बंद लाक्षणिक आंदोलन

‘दिबां’च्या नावासाठी कृती समितीचा वज्रनिर्धार

पनवेल : हरेश साठे
आता बस पुरे झाले! ‘दिबां’च्या नावासाठी काहीही झाले तरी चालेल, अशी रोखठोक भूमिका कायम ठेवत ‘जय दिबा’ असा जयघोष करीत 24 जानेवारीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद पाडण्यात येणार आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, 27 गाव प्रकल्पबाधित कृती समिती व इतर संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी (दि. 21) आगरी समाज मंडळाच्या पनवेल शहरातील महात्मा फुले सभागृहात कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित झाली. त्या वेळी विमानतळ काम बंदचा निर्णय जाहीर करीत यशस्वी होईपर्यंत आंदोलने करीत राहणार असल्याची गर्जना करण्यात आली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र एकवटला आहे. यापूर्वी आंदोलने करीत भूमिपुत्रांची ताकद सिडको आणि शासनाला दाखविण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत ‘दिबां’चे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही आणि त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल असा एल्गार पुकारण्यात आला. दरम्यान, प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत उदासीन असलेल्या सिडको व शासनाने अद्यापही त्यांची मुजोरी कायम ठेवली आहे. त्यामुळे 24 जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन करून जोरदार दणका देण्यात येणार आहे आणि या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असल्याचे या बैठकीत स्पष्ट दिसून आले.
या बैठकीस आमदार महेश बालदी, महापौर कविता चौतमोल, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपमहापौर सीताताई पाटील, माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, 27 गाव प्रकल्पबाधित कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, रूपेश धुमाळ, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण समिती सभापती हर्षदा उपाध्यक्ष, प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, संजना कदम, नगरसेवक हरेश केणी, नगरसेविका दर्शना भोईर, प्रमिला पाटील, तसेच राजेश गायकर, सुरेश पाटील, प्रेम पाटील, विजय गायकर, दीपक पाटील, रविनाथ पाटील, मनोहर पाटील, शैलेश घाग यांच्यासह समिती, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पनवेल तालुक्यात होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचे नाव द्यावे यासाठी सन 2008पासून सिडकोकडे सातत्याने विविध संघटना, संस्था व प्रकल्पग्रस्तांची सातत्याने मागणी आहे. मागील वर्षी 10 जून साखळी आंदोलन, 24 जूनला लाखो भूमिपुत्रांच्या उपस्थितीत सिडको घेराव आंदोलन, 9 ऑगस्ट क्रांती दिनी गावागावात मशाल मोर्चा झाला, तर 13 जानेवारी 2022 रोजी भूमिपुत्र निर्धार परिषद अशी लक्षवेधी ऐतिहासिक आंदोलने झाली. दुसरीकडे सिडकोने या सार्वत्रिक मागणीकडे दुर्लक्ष करीत या विषयी गुपचूप केलेला ठराव विखंडित करण्याचा निर्णय आजवर घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर 13 जानेवारी रोजी झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत विमानतळबाधित 27 गावांच्या प्रलंबित समस्या सोडवण्याविषयी सिडकोस अल्टिमेटमही देण्यात आला होता. याकरिता पोलीस अधिकार्‍यांच्या पुढाकाराने 20 जानेवारीला सिडको प्रशासनाबरोबर 27 गाव विमानतळबाधित प्रतिनिधी आणि विमानतळ नामकरण कृती समिती प्रतिनिधी यांची सिडको भवनात बैठक घेण्यात आली, मात्र सिडको प्रशासन थातूरमातूर उत्तरे देत आपली नैतिक जबाबदारी टाळत असल्याचे बैठकीत स्पष्ट दिसून आले. विमानतळाचे काम बंद पडल्याशिवाय सिडको वठणीवर येणार नाही. त्यामुळे 24 जानेवारीला विमानतळाचे काम बंद पाडण्याचे सर्वानुमते घोषित करण्यात आले आहे. कोविडचा प्रोटोकॉल पाळून सिडकोच्या मुजोरीविरोधातील या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या बैठकीतून करण्यात आले.

…तोपर्यंत आंदोलने सुरूच राहतील -दशरथदादा पाटील
‘दिबा’साहेबांचे नाव विमानतळाला द्यावे आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, ही आमची आग्रही मागणी आहे. ‘आधी पुनर्वसन मग प्रकल्प’ हे शासनाचे धोरण असतानाही शासन दुर्लक्ष करीत आहे आणि यामध्ये राज्य शासन उदासीन आहे. राज्य शासनाची भूमिका प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टिकोनातून मारक आणि घातक आहे. त्यामुळे राज्य शासनावर खटला दाखलच केला पाहिजे. कालच्या बैठकीत सिडकोच्या एमडींचा सकारात्मक दृष्टिकोन नव्हता. पाहतो, बघतो ही भूमिका सिडकोने बैठकीत प्रदर्शित केली. त्यामुळे 24 जानेवारीला प्रकल्पग्रस्तांच्या सर्व संघटना एकत्र येऊन लाक्षणिक काम बंद आंदोलन करणार असून जोपर्यंत विमानतळाला ‘दिबां’चे नाव लागत नाही, तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आंदोलने सुरूच राहतील, अशी भूमिका या वेळी कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी मांडली.

प्रकल्पग्रस्तांबाबत सिडको उदासीन -लोकनेते रामशेठ ठाकूर
सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून गोरगरिबांचे कैवारी लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला मिळावे आणि ती आपली भूमिपुत्रांची अस्मिता आहे. प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सिडको करीत आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार काल सिडको अधिकार्‍यांसोबत सर्वपक्षीय कृती समिती, 27 गाव समिती पदाधिकारी यांची बैठक झाली. सिडकोने केलेला ठराव विखंडित करून ‘दिबा’साहेबांच्या नावाचा ठराव करा, तसेच 27 गावांतील प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लावा असे या बैठकीत सिडकोला ठणकावून सांगण्यात आले, मात्र बैठकीत सिडकोने प्रत्येक विषयात टाळाटाळ केली. थातूरमातूर उत्तरे देत, चार दिवसांत पुन्हा चर्चा करू, असा संधीसाधूपणा करीत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक बाबतीत सिडकोची उदासीनता या वेळी दिसून आली. प्रकल्पग्रस्तांचे बोलणे, रडणे त्यांना ऐकू येत नाही. त्यामुळे 24 जानेवारीला आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला किमान 10 हजार भूमिपुत्र उपस्थित राहतील, असे कृती समितीचे उपाध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

मान्यवरांची लाभली उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान …

Leave a Reply