Wednesday , June 7 2023
Breaking News

सर्वपक्षीय विमानतळ कृती समितीचा सिडकोला एक महिन्याचा अल्टिमेटम

पनवेल : हरेश साठे
भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नावासाठी काहीही झाले तरी चालेल अशी रोखठोक भूमिका कायम ठेवत व ’जय दिबा’ असा जयघोष करीत सोमवारी (24 जानेवारी) लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, 27 गाव प्रकल्पबाधित कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली हजारो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या साक्षीने ओवळे फाटा येथे विमानतळ काम बंद लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. आता पेटवू सारे रान असा एल्गार करीत भूमिपुत्रांनी सिडकोला त्यांच्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. सिडको वठणीवर नाही आली, तर येत्या काळात तब्बल एक लाख भूमिपुत्र रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा या आंदोलनातून देण्यात आला आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या मागील आंदोलनांचा अनुभव घेत या आंदोलनावेळी हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करावा लागला होता. वारकरी मंडळींनी टाळ-मृदंगाचा ठेका घेत ‘दिबां’चा जयजयकार केला, तर ‘दिबासाहेबांचा विजय असो’, ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘सिडको मुर्दाबाद’ अशा घोषणांनी भूमिपुत्रांनी आसमंत दणाणून सोडला. या आंदोलनाचा धसका घेऊन सिडकोने स्वतःहून विमानतळाचे काम बंद केले; अन्यथा विमानतळ क्षेत्रात घुसून काम बंद करण्याची तयारी या वेळी स्पष्टपणे दिसत होती, मात्र विमानतळाचे काम बंद आहे की नाही याची खात्री करण्यासाठी आमदार महेश बालदी, नंदराज मुंगाजी यांच्या नेतृत्वाखाली 50 भूमिपुत्रांनी विमानतळ कामाची पाहणी केली, तेव्हा काम बंद असल्याचे दिसून आले.
रखरखत्या उन्हात या आंदोलनामध्ये लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, 27 गाव प्रकल्पबाधित कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीता पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, कॉम्रेड भूषण पाटील, राजाराम पाटील, संतोष केणे, गुलाब वझे, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, समितीचे खजिनदार जे. डी. तांडेल, दशरथ भगत, रूपेश धुमाळ, प्रेम पाटील, राजेश गायकर, दीपक पाटील, उत्तम कोळी, सुनील पाटील, किसान सभेचे रामचंद्र म्हात्रे, प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, अमर पाटील, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, प्रवीण पाटील, संतोष शेट्टी, विकास घरत, नगरसेविका दर्शना भोईर, चारुशीला घरत, सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, प्रमिला पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर, विजय घरत, गोवर्धन डाऊर, दगडू गायकवाड यांच्यासह युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी प्रमुख नेत्यांसह विक्रांत घरत, प्रेम पाटील, राजाराम पाटील, ह. भ. प. विठाबाई भोईर, जे. डी. तांडेल, गुलाब वझे, पंढरीनाथ पाटील, दगडू गायकवाड, निलेश तांडेल यांचीही भाषणे झाली.

‘दिबां’च्या नावासाठी 105 हुतात्मे द्यायला तयार -दशरथदादा पाटील
रायगडला लोकनेते दि. बा. पाटील नावाचे नेतृत्व दैवत मिळाले आहे. भूमिपुत्रांचे हे आंदोलन दीर्घकाळ चालणार आहे आणि तशी तयारी भूमिपुत्रांनी ठेवली आहे. जोपर्यंत सरकारची सकारात्मक दृष्टी होत नाही तोपर्यंत आक्रमक पवित्रा असणार असून यापुढे तीव्र आणि आक्रमक आंदोलने असतील. भूमिपुत्र संतापलेला आहे. त्यामुळे सिडकोच्या अधिकार्‍यांना बांगड्या भरायला कमी पडणार नाही. भूमिपुत्रांच्या बाबतीत सिडकोच्या एमडींकडे निर्णयक्षमता नसेल तर त्यांनी पद सोडावे, तसेच हे सरकार रक्तपिसासू असेल तर रक्त घ्या, पण ‘दिबां’चे नाव आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात. राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील यांनीही ‘दिबां’च्या नावास पाठिंबा दिला आहे. ‘दिबां’च्या नावासाठी सर्व पक्षांतील नेत्यांनी राजकीय चपला बाजूला सारून सहभागी झाले पाहिजे, असे सांगून लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील म्हणाले की, हे आंदोलन अनेक वर्ष चालेलही, पण भूमिपुत्र शांत राहणार नाही आणि भूमिपुत्र अशांत झाले तर सरकार चालवणे कठीण होईल. संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्मे झाले, तसे ‘दिबां’च्या नावासाठी 105 हुतात्मे द्यायला तयार आहोत. पुढील 24 तारखेला पुन्हा आंदोलन करणार आहोत. त्याची रणनीती येत्या 10 दिवसांत जाहीर करू आणि त्याच्या पुढची आंदोलने यशस्वी होईपर्यंत तीव्र, अतितीव्र स्वरूपात होतील. त्याचबरोबर येत्या काळात पाचही जिल्ह्यांतील एक लाख भूमिपुत्र रस्त्यावर उतरवणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले.

तोपर्यंत लढाई अधिकाधिक तीव्र केली जाईल -लोकनेते रामशेठ ठाकूर
‘दिबा’साहेबांचे नाव आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विमानतळाचे काम बंद पाडण्याची भूमिका घेऊन आपण सर्व आलो. सिडकोला माहीत होते काम बंद नाही केले, तर भूमिपुत्र आंदोलक आक्रमक होईल आणि तोच धसका घेऊन विमानतळाचे काम बंद केले. ज्या स्तरावर आंदोलन होईल त्या वेळेला पुढे जाण्यासाठी युवा आणि महिला सरसावले आहेत. सर्वपक्षीय कृती समिती आणि 27 गाव समिती ‘दिबा’साहेबांचे नाव, 79 गाव तसेच 95 गावांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करीत आहे. दुसरीकडे सर्व बाबतीत सिडको मात्र चालढकल करतेय. चार दिवसांपूर्वी सिडकोसोबत झालेल्या चार तासांच्या बैठकीत सिडकोचे अधिकारी चर्चेत फक्त वेळकाढूपणा करीत होते. किती दिवस चर्चा करायची. आता लढाई उत्तरोत्तर तीव्र करायची. कितीही आंदोलने करावी लागली तरी चालेल, पण सिडकोला स्वस्थ बसू द्यायचे नाही. सिडकोच्या कार्यालयात घुसण्याची तयारी करावी लागेल. हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते, वाया जाऊ द्यायचे नसते हे ‘दिबां’नी शिकवले आहे. जोपर्यंत ‘दिबां’चे नाव आणि भूमिपुत्रांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत लढाई अधिकाधिक तीव्र केली जाईल, असे सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट केले.

यापुढे बेमुदत काम आंदोलन; सिडकोचा चक्का जाम करायचा -आमदार प्रशांत ठाकूर
या वेळी सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या प्रश्नावर सिडकोने डोळे बंद केलेले आहेत. ते उघडण्यासाठी हे आंदोलन उभारले आहे. तळपत्या उन्हात ठाण मांडून भूमिपुत्र या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ‘दिबा‘साहेबांनी संघर्षाचा मूलमंत्र दिला आहे, ही भूमी संघर्षाची भूमी आहे. प्रकल्पग्रस्तांचे हक्क संघर्षाशिवाय मिळत नाही आणि मिळाले नाहीत. सिडकोकडे एमडी, जॉईंट एमडी, आयएएस दर्जाचे अधिकारी आहेत, पण ते फक्त बैठका घेतात. निर्णय काही घेत नाहीत. हे अधिकारी दोन-तीन वर्षांसाठी येतात आणि नव्याने उजळणी करत बसतात. त्यांचा कार्यकाळ संपतो तोपर्यंत त्यांना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाशी काही देणेघेणे नसते. त्या जागी पुन्हा दुसरे अधिकारी आले की पुन्हा सुरुवातीपासून उजळणी सुरू. असे 30 वर्षे सिडकोने वेळ मारूपणा केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सिडकोचे अध्यक्ष केले. त्यानंतर प्राधान्याने मी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय आणि भूमिका घेण्याचे अधिकार्‍यांना वारंवार सांगत आलो. त्या अनुषंगाने निर्णय झाले. साधारण दीड वर्ष मी अध्यक्ष होतो. या काळात दोन निवडणुकांच्या आचारसंहिता लागल्या. वेळ कमी मिळाला, परंतु प्रकल्पग्रस्त स्थानिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सकारात्मक कामे केली, मात्र आज पुन्हा येरे माझ्या मागल्या करीत कारभार करत आहे. सिडकोला वाटतंय कोविड बचावासाठी येईल, सिडको प्रकल्पग्रस्तांना गांभीर्याने घेत नाही. सिडकोकडे निर्णयक्षमता राहिली नाही. त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय उरला नाही. ‘दिबा’साहेबांचे नाव विमानतळाला लागले पाहिजे यासाठी सर्व आंदोलनांत भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचा मोठा वाटा आहे. काम बंद पाडणे आपले उद्दिष्ट नाही, तर प्रकल्परस्तांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत हे आपले प्रमुख उद्दिष्ट आहे. सिडको आणि राज्य सरकार भूमिपुत्रांच्या बाबतीत गंभीर नाही हे प्रकर्षाने जाणवत आहे. आज एक दिवस लाक्षणिक आंदोलन केले, पण यापुढे बेमुदत काम आंदोलन करावे लागेल आणि येत्या काळात सिडकोचा चक्का जाम करावाच लागेल, असा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको व राज्य शासनाला दिला.

हा लढा फक्त 27 गावांचा राहिला नाही, तर संपूर्ण भूमिपुत्रांचा झाला आहे. एक दिवस लाक्षणिक आंदोलन झाले, पण पुढच्या वेळी आंदोलन तीव्र असेल. डिसेंबर 2024मध्ये विमान उडेल असे सिडकोचे अधिकारी सांगतात, पण प्रकल्पग्रस्तांनी विमानतळाचे काम बंद पडले, तर विमान कसे उडेल?
-जगन्नाथ पाटील, माजी मंत्री, सल्लागार, सर्वपक्षीय कृती समिती

हिंमत होती तर आज विमानतळाचे काम करून दाखवले पाहिजे होते. प्रकल्पग्रस्तांची ताकद काय आहे ते दाखवून दिली असती. आजचा हा इशारा होता. पुढचे आंदोलन सिडकोची विचित्र असेल.
-नंदराज मुंगाजी, अध्यक्ष, 27 गाव समिती

लोकभावना लक्षात न घेता बाळासाहेबांच्या नावाचा ठराव -कॉम्रेड भूषण पाटील
आजचे लाक्षणिक काम बंद आंदोलन हा तीव्र लढाईचा इशारा आहे. जोपर्यंत ‘दिबा’साहेबांचे विमानतळाला नाव लागत नाही तोपर्यंत थांबायचे नाही. लोकांच्या भावना लक्षात न घेता बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव केला, पण मागणी करूनही सिडको अद्यापदेखील ठराव भूमिपुत्रांकडे लेखी स्वरूपात का देत नाही? न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार, असे कॉम्रेड भूषण पाटील यांनी सांगितले

एके-56वाल्यांनो हिंमत असेल तर पहिली गोळी मला घाला- माजी उपमहापौर जगदिश गायकवाड
सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या विरोधात कट-कारस्थान केले आहे. विमान उडले नाही, तर प्रकल्पग्रस्तांना काहीही फरक पडणार नाही. प्रकल्पग्रस्त, पोलीस उन्हात आणि सिडकोचे अधिकारी वातानुकूलित कार्यालयात बसले आहेत. ‘दिबां’च्या विचारांचे चिलखत आमच्याकडे आहे म्हणून एके-56वाल्यांनो हिंमत असेल तर पहिली गोळी मला घाला, असे आव्हान देत माजी उपमहापौर व रिपाइंचे कोकण अध्यक्ष जगदिश गायकवाड म्हणाले की, ‘दिबां’चे नाव आणि योग्य पुनर्वसन अशा मागण्या आहेत त्या पूर्ण करा. पोलिसांना पुढे करायचे आणि आंदोलन चिरडायचे हा सिडकोचा धंदा आहे, पण आता माघार नाही. तर प्रकल्पग्रस्तांना सर्वपरीने न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील.

 हे घ्या रक्त, किती पाहिजे ते सांगा -दशरथ भगत
या वेळी सर्वपक्षीय कृती समितीचे कार्यकारिणी सदस्य व नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी आपल्या भाषणात, हे जनसरकार नाही, तर दंडसरकार आहे. पोलीस बांधव आपल्यासोबत आहेत, कारण त्यांना माहीत आहे की, सिडकोने प्रकल्पग्रस्तांवर अन्याय केला आहे. 1984च्या रक्तरंजीत लढाईतून सरकारने रक्त घेतले, पाच हुतात्मे झाले, असा घणाघाती हल्ला चढवत सरकारला रक्ताचा अभिषेक पाहिजे का? आम्ही देतो, पण ‘दिबां’चे नाव विमानतळाला द्या असे आवाहन करून स्वतःच्या हातावर वार करीत रक्त काढले आणि हे घ्या रक्त, किती पाहिजे ते सांगा अशी हाक देत गावागावात रक्ताचा अभिषेक कार्यक्रम घेऊ. तुमच्याकडे गोळी, बंदुका, बॉम्ब आहे, पण आम्ही घाबरणार नाही, आम्हाला नक्षलवादी बनवायचे आहे का ते सांगा, अशी विचारणा केली.

घोषणांनी आसमंत दणाणला
प्रकल्पग्रस्तांच्या मागील आंदोलनांचा अनुभव घेत या आंदोलनावेळी हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करावा लागला होता. वारकरी मंडळींनी टाळ-मृदंगाचा ठेका घेत ‘दिबां’चा जयजयकार केला, तसेच ‘दिबासाहेबांचा विजय असो’, ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘सिडको मुर्दाबाद’ अशा घोषणांनी भूमिपुत्रांनी आसमंत दणाणून सोडला. या आंदोलनाचा धसका घेऊन सिडकोने स्वतःहून विमानतळाचे काम बंद केले; अन्यथा विमानतळ क्षेत्रात घुसून काम बंद करण्याची तयारी या वेळी स्पष्टपणे दिसत होती, मात्र विमानतळाचे काम बंद आहे की नाही याची खात्री करण्यासाठी आमदार महेश बालदी, नंदराज मुंगाजी यांच्या नेतृत्वाखाली 50 भूमिपुत्रांनी विमानतळ कामाची पाहणी केली, तेव्हा काम बंद असल्याचे दिसून आले.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply