अहमदनगर : प्रतिनिधी
मालेगाव येथील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही यावर भाष्य केले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस आमचा मित्र पक्ष आहे, मात्र राज्यात सर्वत्र त्यांचा आमच्याशीच प्रॉब्लेम का? आमचा नेमका मित्र कोण, हे कळत नाही,’ असा टोला तांबे यांनी लगावला आहे. काही दिवसांपूर्वी मालेगाव महापालिकेतील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी पक्षांतर केले आहे. काँग्रेस पक्ष सोडत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावर पटोले यांनी ‘त्यांनी केलेले गैर असल्याचे आम्ही म्हणत नाही, पण आम्ही केलेले ते गैर नाही असे त्यांनाही वाटले पाहिजे, वेळ आल्यावर आम्ही देखील उत्तर देऊ,’ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही यावर भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास अकोलेचे राष्ट्रवादी आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते. तांबे यांनी भाषणात आमदार लहामटे यांना काँग्रेससंबंधी तुमची भूमिका काय, असा प्रश्न करून बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात आमचा मित्रपक्ष आहे, मात्र सर्वत्र आमच्याशीच प्रॉब्लेम का? नेमका मित्र कोण? हा प्रश्न आम्हाला पडला आहे. येणार्या निवडणुकांच्या काळात ते चर्चा करतील अशी अपेक्षा, असा आशावादही तांबे यांनी व्यक्त केला. दरम्यान, संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले यांचा अभिष्टचिंतन सोहळा शनिवारी सायंकाळी झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तांबे व राष्ट्रवादी काँग्रेसचे लहामटे हे एकाच व्यासपीठावर आले होते. आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहेत. बहुतांश नगरपंचातीच्या निवडणुकीत सर्वजण स्वतंत्र लढले आहेत. आता आगामी निवडणुकीत काय भूमिका असेल? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आल्यावर काय बोलतील याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.