Breaking News

अलिबागमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

अलिबाग : प्रतिनिधी

येथील जे. एस. एम. महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त 14 ते 28 जानेवारी या कालावधी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नीळकंठ शेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठी भाषा संवर्धन : उपाययोजना’ या विषयावरील निबंधलेखन, ‘मराठी भाषा महत्त्व व संवर्धन’ या विषयावरील घोषवाक्य लेखन, मराठी भाषा, म्हणी-वाक्प्रचार व साहित्य यावरील प्रश्नांवर आधारित प्रश्नमंजुषा, ‘लॉकडाऊन’ या विषयावरील कथालेखन, ‘स्वातंत्र्याची 75 वर्षे’ या विषयावरील स्वरचित काव्यलेखन अशा विविध स्पर्धांचे व काव्यवाचन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

काव्यवाचन उपक्रमात मराठी भाषेवरील कवितांचे वाचन करण्यात आले. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय अशा दोन गटांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सर्व स्पर्धांमध्ये एकूण 237 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कनिष्ठ महाविद्यालय गटात निबंध लेखन स्पर्धेत मधुरा धुरी हिने प्रथम क्रमांक मिळवला. घोषवाक्य लेखन स्पर्धेत सानिया पाटील, कथालेखनमध्ये जान्हवी पाटील, काव्यलेखनात वैष्णवी पाटील, प्रश्नमंजुषेमध्ये श्रेया अधिकारी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

वरिष्ठ महाविद्यालय गटात निबंध लेखनात साक्षी म्हात्रे, घोषवाक्य लेखनात रिद्धी पाटील, कथालेखनमध्ये तन्वी ठाकूर, काव्यलेखनात सफा बुरोंडकर, प्रश्नमंजुषेमध्ये मयूरेश पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पुस्तक व प्रमाणपत्र या स्वरूपात पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

लवकरच मराठी भाषा संवर्धनासाठी अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील मराठीतील पहिल्या शीलालेखाचे जतन व संवर्धन करण्यासाठी विशेष मोहीम महाविद्यालयातर्फे हाती घेतली जाणार आहे. मराठी विभागातील प्रा. जयेश म्हात्रे, प्रा. सुरभी वाणी, विद्यार्थिनी प्रांजली जाधव यांनी या विविध उपक्रमांचे व सर्व स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply