कर्जत : बातमीदार
खालापूर तालुक्यातील इम्यॅजिका येथे झालेल्या 10व्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनात दिंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रमेश महाराज नाईक यांच्या कर्जत चिंचवली येथील माऊली महिला वारकरी दिंडी पथकाने पहिला क्रमांक मिळविला आहे. राज्यातील 600 हुन अधिक वारकरी मंडळाच्या दिंडी या संत साहित्य संमेलनात सहभागी झाल्या होत्या.
या संत संमेलनात आयोजित दिंडी पथकाने पारंपरिक वेशभूषा करीत सादर केलेले अभंग, कीर्तन आणि हरिपाठ यासाठी तीन टप्प्यात गुण देण्यात आले होते. या तीन टप्प्यांत झालेल्या स्पर्धेतील परीक्षकांनी अखिल भारतीय स्तरावर तीन दिंडींना सर्वोत्कृष्ट दिंडीसाठी पुरस्कार जाहीर केले. त्यात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिंचवली गावातील माऊली महिला वारकरी संप्रदाय मंडळाची दिंडी प्रथम क्रमकांची मानकरी ठरली.
महिलांनी नेतृत्व केलेल्या या दिंडीचे नेतृत्व रमेश महाराज नाईक करीत आहेत. सुधागड येथील दिंडीला दुसरा आणि उंबरे येथील दिंडी तिसरी, तर सोलापूर तालुक्यातील सोलसपूरच्या दिंडीने चौथा क्रमांक पटकावला.