कर्जत : बातमीदार
नेरळ येथे कल्याण-कर्जत रस्त्याला लागून असलेल्या ब्रिटिशकालीन धरणामध्ये प्लास्टिक कचरा आणि पिशव्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे धरणातील गणेश घाटाच्या बाजूला उकिरडा निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने या धरणाची स्वच्छता करावी आणि धरणाभोवती वॉकिंग ट्रॅक उभारावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप उतेकर यांनी केली आहे. ब्रिटिश काळात बांधलेले हे धरण नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीचे असून, या धरणाच्या पाण्यात गावातील सार्वजनिक आणि घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन केले जाते. गणेश विसर्जन घाटाच्या परिसरात कायम स्वरूपी निर्माल्य कलश उभारण्यात आला आहे. मात्र त्या कलशात निर्माल्य न टाकता अनेक नागरिक प्लास्टिक पिशवीत आणलेले निर्माल्य धरणाच्या पाण्यात सोडतात. हे निर्माल्य धरणामध्येच साठून राहिले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्ते संदीप उतेकर यांनी नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाला पत्र दिले असून, त्यात धरणाची तात्काळ स्वच्छता करण्याची तसेच धरणा भोवती वॉकिंग ट्रॅक बनविण्याची मागणी केली आहे.