Breaking News

पनवेल तहसीलदार कार्यालयात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम

पनवेल : वार्ताहर

पनवेल तहसीलदार कार्यालयात बुधवारी (दि. 2) पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी युवकांनी नोकरदार होण्यापेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार विषयक व शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर जी. एस. हरलिया, जिल्हा लीड बँकेचे मॅनेजर विजयकुमार सूर्यवंशी, जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी नित्यानंद पाटील, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रदीप सावंत यांच्यासह आदी उपस्थित होते.

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून प्रत्येक महसूल उपविभागीय स्तरावर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत तरुणांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आजपासून पनवेल तहसीलदार कार्यालयात तहसीलदार विजय तळेकर यांच्या माध्यमातून करण्यात आली. रोजगारविषयक शासनाच्या विविध योजना आहेत. औद्योगिक, अभियांत्रिकी, विविध तंत्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसह इतर नागरिकांनाही शासनाच्या विविध योजनांची माहिती या वेळी देण्यात आली.

राज्यातील युवक/युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळून राज्यात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे, त्याद्वारे राज्यात ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सूक्ष्म, लघु उपक्रमांद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हातभार लावणे, सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, पारंपारिक कारागिरांना एकत्रित करून स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, शहराकडे येणार्‍या बेरोजगार युवकांचे व पारंपारिक कारागिरांचे स्थलांतर थांबविणे, ग्रामीण भागातील रोजगार वाढीस मदत करणे, या उद्देशाने मार्गदर्शन करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply