रसायनी, मोहोपाडा : प्रतिनिधी
पनवेल-पेण रेल्वेमार्गावर आपटा स्टेशनजवळ असलेल्या सारसई पुलावरून जाणार्या पती-पत्नीचा रेल्वेगाडीची धडक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 7) सकाळी घडली.
योगेश खंडू जगताप (वय 31) आणि रजनी योगेश जगताप (वय 26, दोघेही राहणार आपटा, ता. पनवेल) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. त्यांचे मृतदेह आपटा स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या सारसई रेल्वेपुलाखालील नदीपात्रात आढळले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून संपूर्ण घटनाक्रम पाहता हे दाम्पत्य कामासाठी रेल्वेपुलावरून जात असताना त्यांना रेल्वेगाडीची धडक लागली व दोघेही पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला.
अपघात झाल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थ आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य येऊन नदीपात्रातून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. आपटा येथील दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू
झाल्याने या गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत रसायनी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पूल ठरतोय धोकादायक!
आपटा सारसई पुलाजवळ असणार्या आठ आदिवासी वाड्या या रेल्वेपुलाचा रहदारीसाठी वापर करीत असतात. याअगोदरही या पुलावरून प्रवास करताना काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. याची शासनाने दखल घेऊन आपटा बाजूने सारसईकडे जाण्यासाठी पूल उभारावा,
अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …