पनवेल : हरेश साठे
देशातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसरात्र झटून काम करीत आहेत. केंद्राच्या विविध योजनांचा लाभ तळागाळात पोहोचविण्याचे काम मोदी सरकारने पाच वर्षांत प्रामाणिकपणे केले. त्याच वेळी दहशतवाद्यांना वेळोवेळी ठेचून पाकिस्तानला धडा शिकविला. त्यामुळे देशाचा सर्वांगीण विकास आणि सक्षम नेतृत्वासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येणे आवश्यक आहे, असे सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘रामप्रहर’शी बोलताना सांगितले. लोकसभेच्या मावळ मतदारसंघातून खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे आणि रायगडमधून केंद्रीय मंत्री अनंत गीते हे महायुतीचे दोन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होऊन पंतप्रधान मोदींना भरभक्कम साथ देतील, असा विश्वासही आमदार ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध मुद्द्यांवर आपली अभ्यासपूर्ण मते मांडली. लोकसभा निवडणूक देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे. प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि मग स्वतः अशी देशहिताची विचारसरणी भाजपची आहे. त्यामुळे भाजप व मित्रपक्षांच्या एनडीएची सत्ता केंद्रात पुन्हा येईल, असा दावा त्यांनी केला.
देशातील स्थित्यंतराबद्दल आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पाच दशके जनता देशाच्या प्रगतीची आतुरतेने वाट पाहत राहिली, मात्र अपेक्षित विकास झाला नाही. वास्तविक, आपल्या देशात प्रतिभेची वा नैसर्गिक संसाधनांची कमतरता नव्हती. काही करून दाखविण्याची आणि त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची देशवासीयांची तयारीही होती. असे असतानाही आपला देश काँग्रेसच्या काळात मागे पडला. भ्रष्टाचारामुळे तर तो पोखरला गेला. अखेर या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने तारणहार मिळाला. त्यांच्या प्रतिभाशाली नेतृत्वाखाली भाजपप्रणीत सरकारने प्रगती व विकासाची नवी दालने उघडली. त्यांनी केलेले कार्य आदर्शवत ठरले आहे. आज 50 वर्षे विरुद्ध पाच वर्षे असा हिशेब मांडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींची कामगिरी सरस ठरते. देशाच्या प्रगतीबरोबरच जनतेच्या विकासाचा आलेख पंतप्रधान मोदी यांच्या काळात उंचावलेला आहे. याउलट विरोधकांकडे मुद्दे नाहीत. त्यामुळे ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्यांच्या वल्गनांना, दिशाभूल करणार्या कुरघोडींना जनता आता भूलणार नाही. देश प्रथम की परिवार हे नवमतदारांनीही जाणून घेण्याची गरज आहे.
महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थ नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर भ्रष्टाचार वा गैरवर्तनाचा एकही डाग नाही. सर्वांना सोबत घेऊन ते वाटचाल करीत आहेत. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत भाजपला यश मिळाल्याचे दिसून येते. 11 कोटी सदस्य असलेला भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे आणि या पक्षातील आपण कार्यकर्ते आहोत, याचा अभिमान आहे. सामाजिक विचारधारेवर माझे वडील माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमचा पहिल्यापासून विश्वास आहे. याच विचाराने आम्ही आधीही काम केले आहे व यापुढेही करीत राहणार आहोत. आम्ही संघटनशक्तीवर विश्वास ठेवणारे आहोत आणि भाजपचीही तीच बैठक असल्याने या पक्षात काम करताना एक वेगळीच मजा आहे. भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून पक्ष वाढवण्याची जबाबदारी सांभाळत असताना ही वैचारिक बैठक मला खूपच उपयोगी पडली. कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्षवाढीसाठी जे जे करावे लागेल ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही आमदार ठाकूर यांनी दिली.
शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि रायगड मतदारसंघातील उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलेली विकासकामे जनतेसमोर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकारी म्हणून ते संसदेत काम करीत आहेत. सर्वसामान्य जनतेचा आवाज त्यांनी बुलंद केला आहे. ना. गीते यांनी केंद्रीय मंत्री म्हणून उल्लेखनीय कार्य केले, तर खासदार बारणे यांनी सलग पाच वेळा संसदरत्न हा बहुमान मिळविला आहे. या दोन्ही लोकप्रतिनिधींनी विकासाच्या दृष्टिकोनातून कार्य करतानाच सामाजिक जबाबदारी व बांधिलकीही जपली आहे, याकडे आमदार ठाकूर यांनी लक्ष वेधले.
शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. त्यामुळे ते आमचेच उमेदवार आहेत. त्यांना मताधिक्य मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यानुसार आम्ही खासदार श्रीरंग बारणे व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा जोरदार प्रचार केला असून, महायुतीचे हे दोन्ही उमेदवार पुन्हा संसदेत जातील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, याची खात्री असल्याचे आमदार ठाकूर यांनी शेवटी नमूद केले.