Breaking News

रायगडच्या पालकमंत्र्यांना हटविण्याची आमदार भरत गोगावलेंची मागणी

माणगाव : प्रतिनिधी
राज्यात असणारी महाविकास आघाडी सरकारची रायगडात मात्र कायम बिघाडी दिसत असून आता तर रायगडातील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी दाखवित आरोप केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्री हटविण्याची मागणी शिवसेनेचे महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी गुरुवारी (दि. 10) पत्रकार परिषदेत बोलताना केली.
माणगाव शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी दुपारी आमदार भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी पालकमंत्र्यांवर टीकेची झोड उठविली. या वेळी आमदार गोगावले म्हणाले की, रायगडच्या पालकमंत्री आमचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मतदार संघात जाऊन सुरुवातीपासूनच ढवळाढवळ करीत असल्याने आमचे हे दोघे आमदार नाराज होते. आता पालकमंत्री माझ्या महाड मतदार संघात येऊनही विकासकामांच्या बाबतीत ढवळाढवळ करत आहेत.त्यामुळे आम्ही तिन्ही आमदार त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असून रायगडचे पालकमंत्री आता नाही तर अडीच वर्षानंतर बदला व याठिकाणी कोणीही शिवसेनेचा पालकमंत्री करा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असून त्यासाठी लवकरच आम्ही तिन्ही आमदार, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख व शिवसेनेचे पदाधिकारी करणार आहोत.
गोगावले पुढे म्हणाले की, महाड विधानसभा मतदार संघात शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत विविध पिण्याच्या पाण्याच्या योजना मी मंजूर करून आणले आहेत. यापैकी काही योजनांचे काम प्रगतीपथावर सुरू असून काही योजना प्रस्तावित आहेत. पाणीपुरवठा मंत्री आमच्या पक्षाचे आहेत. त्यांच्याकडून या योजना सततचा पाठपुरावा करून मी मंजूर करून आणल्या आहेत, मात्र या योजना आमच्या मतदार संघात येऊन येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचांना पत्र देऊन मी मंजूर करून आणल्याचे पालकमंत्री सांगतात. आम्ही विकासकामे केली नसती तर लोकांनी तीन वेळा मला विधानसभेवर निवडून दिले नसते. आम्ही आमच्या कामांचे श्रेय घेतो दुसर्‍याच्या कामाचे कधी श्रेय घेत नाहीत. जी कामे आम्ही मंजूर करून आणलीत तीच कामे आम्ही लोकांना सांगतो. दुसर्‍यांनी मंजूर करून आणलेली असेल तर ती त्यांनीच आणली असे सांगतो.
आघाडी सरकार स्थापन झाल्यावर ज्या जिल्ह्यातून ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आले असतील त्यांचा पालकमंत्री असे ठरले होते, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आघाडीच्या अन्य पक्षातील नेत्यांशी चर्चा झाल्यावर रायगडाचे पालकमंत्री राष्ट्रवादीला देण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळत आम्ही गप्प बसलो. आता रायगडात पालकमंत्री आदिती तटकरे यांचा आमच्या मतदार संघात चाललेल्या ढवळाढवळीचा विचार करून त्याबाबत नाराजी दर्शवून अडीच वर्षानंतर शिवसेनेचा पालकमंत्री असावा, अशी मागणी आम्ही पक्षश्रेष्टीं तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, महाड विधानसभा मतदार संघाचे क्षेत्रसंघटक अरुण चाळके, तालुका प्रमुख गजानन अधिकारी, माणगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुजित शिंदे, महेंद्र तेटगुरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
पालकमंत्री आघाडीचा धर्म पाळतात का?
नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत आम्ही आघाडीतून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबतीत जुळून घेतले नाही. रायगडच्या पालकमंत्री आघाडीचा धर्म पाळतात का? हा संशोधनाचा विषय आहे. त्यांना वेळोवेळी आघाडी म्हणून आम्ही सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आता त्यांचा अतिरेक झाल्यानेच शिवसैनिकांमध्ये व आमच्या तिन्ही आमदारांमध्ये नाराजी आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply