Breaking News

आंबेत पुलाची पुन्हा होणार डागडुजी; याआधी खर्च केलेेले 12 कोटी पाण्यात

महाड : प्रतिनिधी

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणार्‍या आंबेत पुलाच्या दुरुस्तीसाठी नुकतेच 12 कोटी खर्च करण्यात आले होते, मात्र पुलाचे पिलर झुकल्याचे निदर्शनास येताच या पुलावरील अवजड वाहतूक पुन्हा एकदा बंद करण्यात आली असून, पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात येणार आहे. दरम्यान, भविष्याचा धोका लक्षात घेऊन याठिकाणी नव्या पुलाची उभारणी केली जावी, अशी मागणी आंबेत आणि म्हाप्रळ परिसरातील नागरिकांनी केली आहे. आंबेत पूल गेली दीड वर्षे वाहतुकीसाठी बंद होता. नुकतेच 12 कोटी खर्च करुन या पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत हा पुल वाहतुसाठी खुला केला होता, मात्र हे काम तांत्रिकदृष्ट्या झाले नसल्याने तसेच पिलरला धोका निर्माण झाल्याने हा पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आंबेत गावाजवळ सुमारे 376 मिटर लांबीचा पूल उभारण्यात आला आहे. या पुलाला एकूण सात गाळे असून 30 डिसेंबर 1972 रोजी पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. आणि 16 फेब्रुवारी 1978 रोजी हा पूल पूर्ण झाला. गेल्या 20 वर्षांपासून आंबेत पुलानजीक वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत होते. शिवाय ड्रेझर, बार्ज वाहतूक केली जात होती. त्यामुळे या पुलाला यापूर्वी धोका निर्माण  झाला होता. काही दिवसापूर्वी या पुलाच्या वरच्या बाजूची डागडुजी करण्यात आली होती. त्याकरिता 12 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, मात्र जुलै 2021मध्ये झालेल्या महापुरात पुलाच्या पिलरचा पाण्याखालील भाग वाहून गेल्याचे निदर्शनात आले. भरती आणि ओहोटीच्या वेळेस सुमारे दोन ते चार दोन एमएमने पिलर हालत असल्याचे यांत्रिक साधनाद्वारे दिसून येत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल वाहतूकीसाठी बंद केला आहे.

आंबेत पुलाच्या पिलरच्या दुरुस्तीचे काम  युद्धपातळीवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिलरच्या नवीन कामाचे डिझाईन आल्यानंतर निविदा प्रोसेस केली जाणार आहे. त्यानंतर पुलाच्या दुरूस्तीचे प्रत्यक्ष काम सुरू केले जाईल.

-शिवलिंग उल्लागडे, शाखा अभियंता, सा.बां. विभाग

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply