Wednesday , June 7 2023
Breaking News

वाईन विक्री निर्णयाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका

मुंबई : प्रतिनिधी
सुपर मार्केट तसेच वॉक इन स्टोअरमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे वातावरण तापलेले असतानाच आता सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सरकारचा निर्णय व्यसनमुक्ती धोरणाविरोधात असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या वाईन विक्रीबाबतच्या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते संदीप कुसाळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तरुणांमधील व्यसनाधिनतेला आळा घालणे आणि मद्यपानाच्या सवयीपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करणे याकरिता राज्य सरकारने 2011 साली ऑगस्ट महिन्यामध्ये व्यसनमुक्तीचे धोरण आणले होते, मात्र सरकारचा नवा निर्णय व्यसनमुक्ती धोरण स्वीकारणार्‍या ऑगस्ट 2011च्या सरकारी ठरावाच्या विरोधात असल्याचे कुसाळकर यांनी म्हटले आहे. सरकारचा निर्णय मद्यविक्री कमी करण्याचा उद्देश नष्ट करणारा आणि एखाद्या व्यक्तीला कोणत्याही पर्यवेक्षणाशिवाय स्वत: मद्यखरेदीची सोय उपलब्ध करणारा असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.
सुपर मार्केट, वॉक-इन स्टोअर्समध्ये वाईन विक्रीच्या राज्य सरकारी निर्णयाला सर्वांत आधी राज्यातील विरोधी पक्ष भाजपने तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत वाईन विक्रीविरोधात 17 फेबु्रवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. आता आता सुपर मार्केटमध्ये वाईन येण्यापुर्वीच या निर्णयाविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्याने सरकारचा निर्णय वादाच्या भोवर्‍यात अडकण्याची शक्यता आहे.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply