Breaking News

पुण्यात त्याच पायर्‍यांवर किरीट सोमय्यांचा भाजपकडून सत्कार

पुणे : प्रतिनिधी
भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचे शुक्रवारी (दि. 11) पुणे महापालिकेत जंगी स्वागत करण्यात आले तसेच पुणे महापालिकेच्या ज्या पायरीवर त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली, तिथेच भाजपच्या वतीने सोमय्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत शिवसेनेला प्रत्युत्तर दिले.
किरीट सोमय्या 5 फेब्रुवारीला आधी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करीत तक्रार दाखल केली. यानंतर सोमय्या तेथून पुणे महापालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्या वेळी शिवसैनिकांनी सोमय्या यांना धक्काबुक्की केली. त्याच ठिकाणी त्यांचा शुक्रवारी भाजपकडून शाल, श्रीफळ आणि चाबूक देऊन सत्कार करण्यात आला. भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या वेळी किरीट सोमय्या यांनी भाषण केले. ते म्हणाले, पुण्यातील कोविड सेंटरचा ठेका मिळालेल्या कंपनीचा मालक चहावाला आहे तसेच हा चहावाला केईएम रुग्णालयामागे असतो. ठाकरे सरकारने पुण्याच्या लोकांच्या जीवाशी खेळ केला. संजय राऊत यांची ही बेनामी कंपनी आहे. पुणे महापालिकेने त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत चार ठेके दिले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या बेनामी कंपन्या आहेत. त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply