Breaking News

राज्यात ‘हिवसाळा’

राज्यात ऐन डिसेंबर महिन्यात जलधारा बरसत आहेत. रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण असा विचित्र अनुभव सध्या लोक घेत आहेत. ज्या ऋतूमध्ये गुलाबी थंडी पडते, दाट धुके असते; त्याच हिवाळ्यात अवकाळी पावसामुळे डोक्यावर छत्री धरण्याची वेळ आली आहे. वातावरणातील या बदलाचा सर्वाधिक फटका अन्नदाता शेतकरीवर्गाला बसतोय.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात शुक्रवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. रायगड, मुंबईसह कोकणात व इतर ठिकाणी पहाटेपासूनच अवकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली होती. काही भागात ढगांच्या गडगडाटासह पर्जन्यवृष्टी झाली, तर काही जिल्ह्यांत मळभ दाटले होते. पुढील काही दिवस (15 डिसेंबरपर्यंत) असेच वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, ती खरी ठरत आहे. याचे कारण म्हणजे अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा. समुद्रावरून बाष्प येत असल्याने राज्यातील वातावरण ढगाळ झाले असून, काही ठिकाणी हलका पाऊसही कोसळतो आहे. या घडामोडींमध्ये थंडी गायब झाली आहे. राज्यात सर्वच ठिकाणी आता रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या पुढे गेले असून, मध्य महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत वाढल्याने काहीसा उकाडाही जाणवतो आहे. समुद्रातील चक्रीवादळांच्या मालिकांमुळे नोव्हेंबर महिना कडाक्याच्या थंडीविना गेला. कोरडे हवामान आणि उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांच्या प्रवाहांमुळे डिसेंबरच्या सुरुवातीपासून रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात घट नोंदविली जात होती. गेल्या आठवड्याच्या शेवटी राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमानाचा पारा सरासरीखाली गेल्याने थंडी अवतरली होती. त्यामुळे येत्या काळात गुलाबी थंडी अनुभवता येईल असा सार्‍यांनाच वाटत होते, मात्र पुन्हा एकदा सर्वांची निराशा झाली. ढगाळ वातावरणामुळे जवळपास सर्वच भागांमध्ये किमान तापमानात वाढ होऊन ते काही प्रमाणात सरासरीच्या पुढे गेले आहे. या हवामान बदलाचा सर्वांत जास्त फटका बसतोय तो बळीराजाला. केंद्र सरकारने तीन कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करून देशभरातील शेतकरीवर्गाला दिलासा दिला आहे. शेतकर्‍यांची दलालांकडून होणारी फसवणूक थांबावी व त्यांना त्यांचा शेतमाल कुठेही विकता यावा हा या कृषी कायद्यांमधील सुधारणांमागचा उद्देश आहे. यामुळे शेतकर्‍यांना अनेक पर्याय व संधी उपलब्ध झाल्या आहेत, पण निसर्गापुढे कुणाचे चालत नाही. निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा सर्वाधिक हानी होते ती लाखोंचा पोशिंदा असलेल्या बळीराजाची. यंदाचे वर्ष कोरोनामध्ये सरत असताना अतिवृष्टी, चक्रीवादळे, अवकाळी अशा नैसर्गिक संकटांनाही राज्यातील शेतकर्‍यांना सामोरे जावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे. खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्यानंतर शेतकर्‍यांनी मागचे सारे विसरून नव्या जोमाने रब्बी पिकाची तयारी केली. आपले शिवार फुलविण्यासाठी शेतकरी मेहनत घेत असताना अवकाळी पावसामुळे या सार्‍यावर पाणी फेरले जाण्याची भीती आहे. आधीच काही शेतकर्‍यांना राज्य सरकारकडून मागील नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही. पावसाने मारले आणि राजाने झोडपले तर दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न त्यांना पडला आहे. आता पुन्हा शेतीला झळ बसली तर करायचे काय या विवंचनेते शेतकरी आहेत. कोरोनाप्रमाणेच हे संकटही दूर व्हावे अशीच अवघ्या महाराष्ट्राची इच्छा आहे.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply