जुन्या पुलालाच नवीन साज देण्याचा प्रकार? नागरिकांचा सवाल
श्रीवर्धन ः प्रतिनिधी
श्रीवर्धन- दिवेआगर मार्गावरील कोंडीवली गावाजवळ जुनाट पुलाचे अर्धवट बांधकाम ठेवले असल्याचा आरोप नागरिकांमधून केूला जात आहे. जुन्या पुलाचे जीर्ण झालेले आतील भाग तसेच ठेऊन त्यावर जॅकेटवॉल बांधून जुन्या पुलाला नवीन दाखवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
डोंगर व शेतीमधील पावसाचे पाणी जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या खूप जुन्या जीर्ण झालेल्या पुलाची नव्याने बांधणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 40 ते 42 लाख रुपयांचा ठेका काढण्यात आला आहे. सध्या जुन्या पुलावर जॅकेटवॉल बांधण्याचे काम सुरू आहे. बांधकामासाठी रेती उपलब्ध नसल्यामुळे शासकीय कामासाठी क्रशहँड खडी वापरण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र याठिकाणी सर्रास गिरीटचा वापर केला जात असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत. सतत रहदारी असलेल्या मार्गावरील हा निकृष्ठ दर्जाचा पूल भविष्यात धोकादायक ठरू शकतो, अशी भीती नागरिकांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे या कामाची वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून चौकशी व पाहणी करून निकृष्ठ काम करत असल्यामुळे तात्काळ काम बंद करून ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
40 ते 42 लाखांचा ठेका असून अशा पद्धतीचे जॅकेट वॉल बांधण्याबाबत निविदेत नमूद करण्यात आले आहे. त्याप्रमाणे काम सुरू आहे.
-जेठे, अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग