नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारतातील अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताच्या कूटनीतिला यश आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) बुधवारी (दि. 1) मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे.
संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी यासंदर्भात ट्विट करून ही माहिती दिली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या मंजूर यादीमध्ये मसूद अझहरचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून समावेश करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. यूएनएससीत ज्यांनी भारताला साथ दिली त्या सर्वांचे त्यांनी आभारही मानले आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताकडून चौथ्यांदा मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे यासाठी प्रस्ताव मांडला होता. यापूर्वी तीन वेळा चीनने आपला विटो विशेषाधिकार वापरत या प्रस्तावाला विरोध केला होता, मात्र यंदा पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या या मागणीला अमेरिका, फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह अनेक देशांनी पाठिंबा दिला. आंतरराष्ट्रीय दबावामुळे चीनला आपल्या भूमिकेत बदल करत नरमाईची भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे कायम पाकला पाठिंबा देणार्या चीननेच माघार घेतल्याने पाकिस्तानला चांगलाच दणका बसला आहे.
भारताने यापूर्वी तीन वेळा अझहरवर बंदी घालण्यात यावी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला होता, मात्र आता भारताच्या या प्रयत्नांना यश आले. भारताच्या कूटनीतिचा हा मोठा विजय असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर आता अझहर पाकिस्तान सोडून इतर कुठल्याही देशात जाऊ शकणार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या कुठल्याही सदस्य देशाला मसूदला अर्थपुरवठा वा हत्यारे पुरवता येणार नाहीत. यामुळे मसूदची दहशतवादी संघटना ‘जैश’चे कंबरडे मोडले जाणार आहे. मसूदच्या अटकेसाठी पाकवर आता दबाव वाढून पाकला त्याच्यावर कारवाई करणे भागच पडणार आहे.