मुरूड : प्रतिनिधी
शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. हे काम मजबूत व टिकाऊ व्हावे, यासाठी भाजप कार्यकर्ते जागता पहारा देणार असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांनी दिली. मुरूड शहरातील रस्त्यांसाठी नगरविकास खात्याकडून नगर परिषदेला पाच कोटी रुपये रक्कम प्राप्त झाले आहेत. त्यामुळे लवकरच शहरातील रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आण्णा कंधारे प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपचे तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष परेश किल्लेकर, बाळा भगत, शहर अध्यक्ष उमेश माळी, शेगवाडा अध्यक्ष सुधीर पाटील आदी यावेळी उपस्थित होते. मुरूड नगर परिषदेने सन 2019 ते 21 या तीन वर्षात रस्त्यांच्या कामासाठी एक कोटी 53 लाख 14 हजार 952 रुपये खर्च केले आहेत. तर रस्ते दुरुस्तीसाठी 30 लाख 10 हजार 938 रुपये खर्च झाले आहेत. मात्र दोन वर्षापूर्वी तयार केलेले ना रस्ते टिकले, ना दुरुस्तीचा भाग. त्यामुळे जनतेचा पैसा वाया गेला असल्याचे कंधारे यांनी यावेळी सांगितले. दोन वर्षापूर्वी ज्या ठेकेदाराने रस्त्यांची कामे केली, त्यांना नगर परिषदेने पुन्हा काम देता कामा नये. आता होणारे रस्ते मजबूत व जास्त वर्ष टिकणारे असावेत, रस्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी नगर परिषदेचा इंजिनियर उपस्थित असला पाहिजे, रात्रीच्या वेळी कोणतेही काम खपवून घेतले जाणार नाही, रस्त्याचे काम सुरु करण्यापुर्वी जलवाहिन्या टाकण्याची कामे करावीत, असे स्पष्ट करून, ‘ठेकेदाराने अंदाजपत्रकाप्रमाणे काम न केल्यास भाजप मोठे जनआंदोलन करेल‘, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांनी यावेळी दिला.
RamPrahar – The Panvel Daily Paper