पाली, नागोठणे : प्रतिनिधी
नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करकरणी देवी मंदिर परिसरात जंगलात रविवारी (दि.3) महिलेला ठार मारून पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिहू विभागातील दोन तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधामुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचण्यास मदत झाली. मोटारसायकल क्रमांकावरून नागोठणे पोलिसांनी चार तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या. फिर्यादी जयेश यशवंत घासे व नागोठणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान घटना घडली आहे. आरोपी विजय लक्ष्मण शिद (वय 22, रा. उनाटवाडी, भिसे खिंड) हा आपल्या ताब्यातील मोटारसायकल (एमएच-04,एफएन-4496) घेऊन करकरणी मंदिर परिसरात आला होता. यावेळी त्याच्या समवेत असलेल्या महिलेशी (मुळ गाव उनाटवाडी) त्याचा वाद झाला. या वादाचे रूपांतर तिच्या हत्येत झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपीने महिलेला मंदिरापासून काही अंतरावर नेऊन ठार मारले व मोटारसायकलमधील पेट्रोल टाकून तिला जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मंदिर परिसरात एलएनटी येथे नव्याने सुरु असलेल्या प्रकल्पाच्या साईटवर सुरक्षारक्षक असलेले चेतन गदमळे व जयेश घासे यांना आरोपी विजय शिद याच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यांनी मोटरसायकलचा व नंबरचा फोटो मोबाईलमध्ये काढून घेतला. व घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी महिला दगडांच्या चिर्यात जळत असल्याचे निदर्शनास आले. त्या दोघांनी तात्काळ स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर नागोठणे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवार यांनी तात्काळ महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दरम्यान, मोटारसायकलच्या क्रमांकावरून घराचा पत्ता मिळवून पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी विजय शिद याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास सुरू आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper