Breaking News

मोदी सरकार शेतकर्‍यांच्या विकासासाठी कटिबद्ध

भाजप नेते अ‍ॅड. महेश मोहिते यांच्याकडून योजनांची माहिती

 

अलिबाग : रामप्रहर वृत्त

पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे शेतकर्‍यांना एक लाख सात हजार कोटींची भरपाई देण्यात आली असून किसान सन्मान निधीद्वारे देशातील सुमारे 12 कोटी शेतकर्‍यांना 1.82 लाख कोटी इतक्या रकमेचे वाटप, तर 23 कोटी मृदा आरोग्य कार्डचे वाटप करून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शेतकर्‍यांच्या विकासासाठी दमदार पावले टाकली आहेत, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिली. भाजपच्या 42व्या स्थापनादिनानिमित्त मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती अ‍ॅड. मोहिते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू या अन्नधान्यांच्या तसेच तेलबियांच्या किमान हमी भावात (एमएसपी) मोदी सरकारने गेल्या सहा वर्षांत भरीव वाढ केली आहे, असे त्यांनी सांगितले.अ‍ॅड. मोहिते यांनी पुढे नमूद केले  की, शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने अनेक निर्णय प्रत्यक्षात आणले आहेत. 2022-23च्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी एक लाख 23 हजार 960 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. किसान सन्मान निधी या योजनेद्वारे शेतकर्‍यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. योजनेचा प्रारंभ झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांत या योजनेद्वारे आतापर्यंत 10 हफ्त्यांत एक लाख 82 कोटी इतक्या रकमेचे वाटप करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना गरजेवेळी तातडीने पैसे उपलब्ध व्हावेत या हेतूने तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कमीत कमी व्याजदरात किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. 4 मार्च 2022पर्यंत 2.94 कोटी शेतकर्‍यांना 3.22 लाख कोटी इतक्या रकमेचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या योजनेसाठी शेतकर्‍यांकडून प्रोसेसिंग फी वगैरे कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. नैसर्गिक आपत्ती तसेच अन्य कारणांमुळे पिकांचे होणारे नुकसान भरून देण्यासाठी 2016मध्ये पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली. गेल्या सहा वर्षांत या योजनेद्वारे एक लाख सात हजार कोटी इतक्या रकमेचे वाटप करण्यात आले आहे. शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी बाजार (ई नाम) या योजनेत 1.72 कोटी शेतकर्‍यांनी नोंदणी केली असून 1.82 लाख कोटी रकमेच्या शेतमालाची विक्री यातून झाली आहे. शेतकर्‍यांना जमिनीचे माती परीक्षण करून देऊन त्याद्वारे जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी मृदा आरोग्य कार्डचे वाटप केले जाते. आतापर्यंत 23 कोटी मृदा आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले आहे. मातीची तपासणी करण्यासाठी 11 हजार 531 प्रयोगशाळांना मंजुरी देण्यात आली आहे, असेही अ‍ॅड. मोहिते यांनी म्हटले आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील यांनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केले आहे.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply