Breaking News

तीन आमदार, पालकमंत्री, खासदार तरीही रोहा-अलिबाग रस्ता बेकार; प्रवाशांचे हाल

रोहे : प्रतिनिधी

रोहा-अलिबाग रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या मार्गावरील सानेगाव फाटा (निडी) ते डोंगरी, करंजविरा ते चिंचोटी या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. या महत्वाच्या व प्रवाशांच्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे लोकप्रतिनिधी लक्ष घालणार का, असा सवाल समोर येत आहे.

रायगड जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबागला जाण्यासाठी रोहा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या तालुक्यातील नागरिकांना जवळचा मार्ग म्हणून रोहा-अलिबाग रस्ता सोयीचा ठरतो. हा रस्ता दूरुस्त व्हावा, नागरिकांची मागणी आहे. परंतु श्रेयवाद व आरोप-प्रत्यारोपात अडकलेल्या नेतेगणांमुळे हा रस्ता अद्याप दुर्लक्षित राहिला आहे. आता काही प्रमाणात अलिबाग ते वावे रस्ता चांगला झाला आहे. मात्र उर्वरित रस्त्याची चाळण झाल्याचे दिसून येते.

रोहा-अलिबाग हा रस्ता ज्यांच्या विधानसभा मतदार संघात येतो ते आमदार महेंद्र दळवी, विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील, आमदार अनिकेत तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे या लोकप्रतिनिधींचे या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष का जात नाही, हा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे. महत्वाचे म्हणजे हे सारेच नेते रस्ता मंजुर झाला आहे. लवकरात लवकर होईल, आम्ही आंदोलन केले आहे. त्याला यश मिळाले आहे. हा रस्ता होणार अशी अनेक आश्वासने देतात. मात्र गेली कित्येक वर्षे हा रस्ता आहे तसाच राहिला आहे.

मधला भाग वगळता रोहा-अलिबाग रस्त्याची चाळण झाली आहे. वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेवून वाहन चालवावे लागते. खड्डे चुकविताना या रस्त्यावर अनेकदा छोटे-मोठे अपघात झाले आहेत. या रस्त्यावरून नियमीत प्रवास करणार्‍यांना विशेषत: कमरेचे आजार झाले आहेत. रोहा-अलिबाग हा रस्ता कधी होणार, मंजूर आहे मग का होत नाही, जिल्ह्यातील अन्य रस्ते होत असताना हा रस्ताच का रखडला असे अनेक प्रश्न विचारले जात असताना या रस्त्याकडे सार्‍याच स्थानिक नेत्यांचे दुर्लक्ष झाले एवढे निश्चित. आता पावसाळा सुरू होण्यास दीड ते दोन महिने शिल्लक आहेत. या दरम्यान हा रस्ता होण्याची गरज आहे. एकदा का पावसाळा सुरू झाला की, हा रस्ता दुर्लक्षित होणार आहे. त्यामुळे या सार्‍याच लोकप्रतिनिधींनी आपली राजकीय ताकत वापरून हा रस्ता येत्या पावसाळ्याआधी सुस्थितीत करावा, अशी मागणी होत आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply