नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
मार्च महिन्यापासून अचानक वाढलेल्या तापमानाचा भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असून तीव्र उन्हामुळे माल खराब होत आहे. त्यामुळे एपीएमसीतील भाजी बाजारात आवक कमी होत असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरात 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे. एपीएमसी बाजारात टोमॅटो, भेंडी, कारली, फरसबी, पापडी, वांगी आणि पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. हिवाळ्यात भाज्यांचे उत्पादन अधिक असल्याने 550 ते 600 गाड्या आवक होत असते. मात्र उन्हाळा सुरू होताच भाज्यांची आवक घटत असते. सध्या बाजारात 150 ते 200 गाड्या आवक कमी होत आहे. त्यात उन्हामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही अधिक असल्याचे घाऊक व्यापार्यांनी सांगितले.
भाजीपाल्याचे दरही वाढले : घाऊक बाजारात भेंडी आधी 24 ते 25 रूपयांवरून आता 30 रूपये तर पापडी 70 ते 75 रूपयांवरून 90 रूपये, टोमॅटो 14 ते 15 रूपयांवरून 18 ते 20 रूपये, फरसबी 70 ते 75 रूपयांवरून 80 ते 90 रूपये, कारली 20 ते 22 रूपयांवरून 32 रूपये, वांगी 26 ते 28 रूपयांवरून 34 ते 35 रूपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले आहे.