‘साखरेत घोळले तरी कारले कडू ते कडूच’ या मराठी म्हणीचे प्रत्यंतर सध्या शिवसेनेच्या अवस्थेकडे बघून येते. भारतीय जनता पक्षाच्या प्रदीर्घ साहचर्यानंतर हा पक्ष लोकशाहीची मुळाक्षरे तरी ओळखू लागला असेल असे वाटले होते, परंतु गेल्या दोन-अडीच दशकांतील साहचर्याचे गाठोडे झुगारून देत हा पक्ष महाराष्ट्राला पुन्हा एकदा राडा संस्कृतीकडे नेण्यास उत्सुक झालेला दिसतो.
गेल्या दोन दिवसांत मुंबईत घडलेल्या घडामोडी पाहिल्या की कुठल्याही सुजाण नागरिकाचे मन विषण्ण होईल. कुठे नेऊन ठेवली माझी मुंबई? असा प्रश्न कुठलाही सुजाण मुंबईकर विचारील, परंतु सत्तेच्या मदामुळे अंध झालेल्या शिवसेनेला त्यांची पर्वा नाही. अमरावतीचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत राणा यांनी गेल्या आठवड्यात मातोश्री या मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानासमोर उभे राहून हनुमान चालिसाचे पठण करण्याचा मनसुबा जाहीर केला होता. खरे तर राणा दाम्पत्याच्या या मनसुब्याला आंदोलनदेखील म्हणता येणार नाही. त्यांना फक्त हनुमान चालिसाचे पठण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या विस्मृतीत गेलेले हिंदुत्व आठवून द्यायचे होते, परंतु या निरुपद्रवी कृतीमुळे सत्ताधार्यांचे पित्त खवळले. महाराष्ट्रात कोणीही सार्वजनिक ठिकाणी उभे राहून देवाचे नाव घेत असेल तर त्याला विरोध करण्याचे कारण काय? राणा दाम्पत्याची ही कृती राजकारणाचा भाग होता असे घटकाभर गृहित धरले तरी शिवसेनेचा विखारी विरोध समजून घेता येण्याजोगा नाही. हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी आलेल्या राणा दाम्पत्याकडे मुख्यमंत्री ठाकरे यांनी दुर्लक्ष केले असते तरी काहीही बिघडले नसते. त्यामुळे राणा दाम्पत्याचे राजकारण सहजच धुळीस मिळाले असते, परंतु ही परिपक्वता ना मुख्यमंत्र्यांनी दाखवली, ना पोलीस प्रशासनाने. राणा दाम्पत्याची तोंडे बंद करण्यासाठी झुंडशाहीचा मार्ग अवलंबण्यात आला. या दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानी पोलिसांनी त्यांना अक्षरश: स्थानबद्ध केले आणि दिवस मावळताना भलभलती कलमे लावून त्यांना अटकही केली. दिवसभर त्यांच्या घरासमोर झुंडशाहीचे जे प्रदर्शन घडवण्यात आले, त्याने अवघ्या महाराष्ट्राला ओशाळल्यासारखे झाले असेल. पोलिस ठाण्यामध्ये राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेलेले भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करावा तितका थोडाच आहे. गेले अनेक महिने सोमय्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे एका पाठोपाठ एक बाहेर काढत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी हैराण झाली आहे हे उघडच दिसते. सोमय्या यांच्यावर शनिवारी रात्री झालेला प्राणघातक हल्ला हा काही पहिला नव्हे. आजवर दोन-तीन वेळा त्यांना गंभीर इजा पोहोचवण्याचे प्रयत्न झाले आहेत. त्यांच्यावर इतके हल्ले होऊनही आजवर कोणालाही अटक झाल्याचे कळलेले नाही. त्याच्या आधी भाजपच्या पोलखोल यात्रेचे वाहन चेंबूर येथे उद्ध्वस्त करण्याचे पुण्यकर्म सत्ताधार्यांच्या काही तथाकथित कार्यकर्त्यांनी पार पाडले होतेच. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही सत्ताधार्यांच्या सूडबुद्धीचे परिणाम भोगावे लागले आहेत. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत की हाणामारीवर उतरायचे हा टोळीयुद्धाचा नियम आहे, लोकशाहीचा नव्हे. सध्या तरी मुंबई व महाराष्ट्रात राजकारणाला गँगवॉरचे स्वरुप येऊ लागले आहे असे खेदाने म्हणावे लागते. सत्ता गेल्यानंतर या सार्याची परतफेड करावी लागेल एवढे भान तरी सत्ताधार्यांनी ठेवावे.