Breaking News

आरोग्य विभागाची पुस्तके रस्त्यावर

रायगड जिल्हा परिषदेचा ढिसाळ कारभार

अलिबाग : प्रतिनिधी

महिला, बाल विकास विभाग आणि आरोग्य विभाग यांनी छापलेली नवीन पुस्तके मंगळवारी (दि. 10) रात्री अलिबागमधील रस्त्यावर पडल्याचे दिसून आले. या प्रकारानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि महिला व बाल विकास विभागामार्फत या पुस्तकांची छपाई करण्यात आली होती. त्यानंतर ही पुस्तके सर्व तालुक्यांमध्ये वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र मंगळवारी जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील इमारतीसमोर या पुस्तकांचे गठ्ठे बेवारसपणे पडून असल्याचे आढळून आले. रात्री उशीरापर्यंत ही पुस्तके तशीच रस्त्याच्या कडेला दुर्लक्षीत पडून होती. नागरिकांनी याबाबतच्या तक्रारी प्रशासनाकडे केल्यानंतर ही पुस्तके उचलून नेण्यात आली.

कोव्हीडच्या साथीमध्ये लहान मुलांची घ्यावयाची काळजी, सूचना इत्यादी बाबतची ही पुस्तके असल्याचे प्राथमिक दृष्टया दिसून आले आहे. कोव्हीडच्या साथीमध्ये शासनाने उपाययोजना व प्रतिबंधात्मक मार्गदर्शन यासाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी वारंवार केलेला आहे. करोडो रुपयांची बिले काढून छापलेली ही पुस्तके अशी रात्री रस्त्यावर निष्काळजीपणे ठेवल्याचे या निमित्याने पहायला मिळाले.

दरम्यान, या प्रकरणाची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी गंभीर दखल घेतली असून संपुर्ण पुस्तके तेथे कशी आली, कोणी ठेवली याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

कोव्हीड काळात लाखो रुपये खर्ची घालून या पुस्तकांंची निर्मिती करण्यात आली होती. ही पुस्तके कोणी बेवारसपणे रस्त्यावर टाकली, हे समोर यायला हवे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली आहे.

विविध तालुक्यांना ही पुस्तके वितरित करण्यात आली होती. ज्या तालुक्यातील कर्मचार्‍यांनी ही पुस्तके रात्रभर रस्त्यावर ठेवली त्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.

-डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply