‘पीएमएवाय’चा लाभ मिळवून देण्याची नगरसेवक भुजबळ यांची मागणी

पनवेल : प्रतिनिधी
रोग झाला म्हणून गावातून हाकलले. तेव्हापासून इथेच राहतोय, पण आता रेल्वेचे नवीन काम सुरू झाले, म्हणून इथून जायच्या नोटिसा दिल्यात आम्ही आता जायचे कोठे, आम्हाला इथेच जागा द्या, असा आक्रोश तेथील नागरिक करीत आहेत. त्यामुळे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्र देऊन कुष्ठरोग व लोकमान्य वसाहतीतील कुटुंबांचे पीएमएवाय (प्रधानमंत्री आवास योजना) अंतर्गत पुनर्वसन करण्यासाठी मागणी केली आहे.
पनवेल ,उरण तालुक्यातील समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांची वसाहत त्यावेळी पनवेल शहरातील प्रभाग 9 मधील सर्व्हे न. 389 या स्मशांनासाठी राखीव असलेल्या भूखंडावर वसली आहे. पनवेल रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक 1च्या बाजूला श्री गणेश कुष्ठ रोग वसाहत आहे. या वसाहतीत 24 कुटुंबे आहेत. अकुर्ली, वाघिले या भागातून आलेली ही कुटुंबे या ठिकाणी झोपड्या बांधून राहू लागली. त्यावेळी मालगाडीतून येणार्या तांदुळाच्या पोत्यातील सांडलेले तांदूळ गोळा करून ते विकून त्यांची उपजीविका चालत, असे छबीबाई आंबेकर सांगतात. आपल्या पतीबरोबर त्या इथे आल्या त्यावेळी गरोदर होत्या. त्यांच्या मुलाची मुले आज महाविद्यालयात शिकत आहेत.
पनवेल नगर परिषदेने त्यांना कालांतराने पाणी, शौचालय व विजेची सोय करून दिली. पिवळी रेशन कार्ड मिळाली संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिला आहे, पण महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन सन 1995 च्या योजनेत त्याची नावे समाविष्ट करण्यात आली नाहीत. समाजाने त्यांना लाथाडले होतेच पण सरकारने ही लाथाडले. जिल्हाधिकार्यांनी फेर सर्व्हे करण्याचे आदेश दिले. आपल्याला घर मिळावे म्हणून त्यांनी सरकार दरबारी अनेक प्रयत्न केले. घर मिळण्याऐवजी सिडकोने त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न केला.
पनवेल रेल्वेचे आशिया खंडातील मोठे जंक्शन होणार असल्याने त्याचा विकास करण्यासाठी पुन्हा त्यांना तेथून हलवण्यासाठी झोपड्यांवर नबर टाकून नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांना येथून कल्याणला हलवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आज येथील दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना औषधे देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांची मुले येथील शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. काहीजण छोटे-मोठे उद्योग धंदे, नोकरी किंवा हमाली करून उपजीविका करीत आहेत, असे असताना आम्ही कोठे जायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे. प्रथम आमची राहण्याची सोय करावी नंतर आमच्या झोपड्या पाडाव्यात अशी मागणी संस्थेचे सचिव अशोक आंबेकर यांनी केली आहे.
मालधक्का वसाहत रेल्वेच्या आणि लोकमान्य वसाहत सिडकोच्या जागेत आहेत यामध्ये मालधक्का वसाहतीत 165 व लोकमान्य वसाहतीत 30 झोपड्या आहेत. सुमारे 45 वर्षांपासून तेथे असल्याने पनवेलच्या जडण-घडणीत ही त्यांचाही वाटा आहे. त्यांना पाणी, वीज, शौचालय व प्राथमिक सुविधा नगरपरिषदेनेच उपलब्ध करून दिल्या होत्या. पनवेल हे सर्वांत मोठे रेल्वे टर्मिनल म्हणून विकसित होत आहे. त्यामुळे यांचे पीएमएवाय अंतर्गत पुनर्वसन करावे, अशी मागणी पत्र देऊन महापालिका आयुक्तांकडे केली आहे. -अॅड. मनोज भुजबळ, नगरसेवक
आम्ही 50 वर्षे येथे राहत आहोत. पनवेल, उरण तालुक्यातून आमच्या पालकांना कुष्ठरोग झाला म्हणून गावातून हाकलून लावले. मी लहानाचा मोठा इथेच झालो. माझी मुले येथील महाविद्यालयात शिकत आहेत. आमचा शासनाला विरोध नाही पण आम्हाला पनवेलमध्येच जागा मिळावी, अशी आमची मागणी आहे. -अशोक आंबेकर, सचिव, श्री गणेश कुष्ठरोग वसाहत सेवा संस्था
RamPrahar – The Panvel Daily Paper