उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
आदिवासी बांधवांना भेडसावणारी पिण्याची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पुढाकार घ्यावा, असे आदेश उरणचे आमदार महेश बालदी यांनी उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना दिले आहेत.
चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील केळाचामाल, चांदायणी आदिवासी वाडीतील बांधवांना पाणीपुरवठा करणार्या विहीरीने तळ गाठल्याने या वाडीवरील आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यातच भर उन्हाळ्यात डबक्यातील दुषित पाणी प्यावे लागत असल्याने अनेक आजारांचा सामना या वाडीवरील आदिवासी बांधवांना करावा लागत आहे.तरी भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी चिरनेर ग्रामपंचायत, उरण पंचायत समितीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी वारंवार आदिवासी बांधवांनी केली. परंतु संबंधित प्रशासनाने आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यास तसेच पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी चालढकलपणा केला.
चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील केळाचामाल, चांदायणी आदिवासी वाडी वरील आदिवासी बांधवांनी मंगळवारी (दि. 17) उरणचे आमदार महेश बालदी यांची भेट घेऊन आदिवासी बांधवांना भेडसावणार्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली. या मागणीची दखल आमदार महेश बालदी यांनी घेऊन उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती निलम गाडे यांनी तातडीने प्रयत्न करावे असे आदेश दिले.
आमदार महेश बालदी यांच्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून आदिवासी बांधवांना तातरीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच लवकरच सदर आदिवासी बांधवांना पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी पुढाकार घेऊ, असे गटविकास अधिकारी निलम गाडे यांनी नमूद केले.