Breaking News

केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेत रायगड जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. सन 2016-17 ते 2021-22 या मागील सहा वर्षात रायगड जिल्ह्यात योजनेच्या अनुदानातून सात हजार 333 लाभार्थ्यांनी घरकुले बांधली असून, आणखी दोन हजार 480 घरकुले बांधण्याचे काम सुरू असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक निलेश घुले यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या सहकार्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या कार्यालयामार्फत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत शबरी आवास योजना, रमाई आवास योजना व आदिम जमाती घरकुल योजना या घरकुल योजना राबविण्यात येतात. यामधील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील भूमिहीन किंवा कच्चे घरात वास्तव्य करणार्‍या लाभार्थ्यास घरकुलाचा लाभ देण्यात येतो. 2016-17 ते 2021- 22 या मागील सहा वर्षांत रायगड जिल्ह्याला नऊ हजार 813 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.  यामधील नऊ हजार 675 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी सात हजार 333 घरकुले बांधून पूर्ण झाली असून, दोन हजार 480 घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत 60 टक्के निधी केंद्र शासनाकडून व 40 टक्के निधी राज्य शासनाकडून प्राप्त होतो. योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील भूमिहीन किंवा कच्चे घरात वास्तव्य करणार्‍या लाभार्थ्यास घरकुलाचा लाभ देण्यात येतो. या लाभार्थ्यांची निवड ही आर्थिक सामाजिक जात सर्वेक्षण 2011 नुसार व प्रपत्र ड नुसार प्राधान्यक्रमाने करण्यात येते.घरकुल बांधकामासाठी एक लाख 20 हजार रुपये अनुदान स्वरूपात घरकुलाच्या प्रगतीनुसार देण्यात येते. तसेच मनरेगा अभिसरण स्वरूपात 90-95 दिवसांचा रोजगार अकुशल स्वरूपात जवळपास रूपये 18 हजार रुपये व शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रूपये 12 हजार रुपये असे एकूण एक लाख 80 हजार रुपये अनुदान देण्यात येते.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply