प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र होतेय कौतुक
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमधील झोपडपट्टीत राहून मोलमजुरी करणार्या एका महिलेच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत 84.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल त्याचे व पालकांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
प्रशांत शांताराम शिंदे असे दहावीत सुयश प्राप्त करणार्या विद्यार्थ्याचे नाव असून त्याची आई सुशिला ही पती शांताराम शिंदे यांच्यासोबत पनवेल येथील आझादनगर झोपडपट्टीत राहते. सुशिला मोलमजुरीचे काम करून पतीला उदरनिर्वाहासाठी हातभार लावते. त्यांचा मुलगा प्रशांत हा आजी-आजोबांसोबत अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील लहित खुर्द गावात राहतो. तो तेथे शिकत असून आजी-आजोबांना मदतही करतो.
प्रशांतने दहावीच्या परीक्षेत साने गुरुजी शिक्षण मंडळ, नारोड संचलित लहित खुर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असूनही त्याने तब्बल 84.80 टक्के गुण मिळविले आहेत. याबद्दल भाजपचे पनवेल येथील ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांनी प्रशांत व त्याच्या पालकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.