तब्बल 70 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल
पनवेल : वार्ताहर
साठ लाख रुपयांमध्ये रो हाऊस देतो, असे सांगून रो हाऊस बँकेत गहाण ठेवला व ठेवी डिपॉझिट करता 10 लाख रुपये घेऊन राज्य वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागातील सहआयुक्त रमेश भागूजी जैद (वय 58) यांची 70 लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी जयराम राय यांच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश जैद हे खारघर, सेक्टर 5 येथे राहत असून ते जागेच्या शोधात असताना त्यांची ओळख खारघर परिसरात राहणार्या जयराम भागीरथी राय यांच्यासोबत झाली. ते व्यवसायाने बिल्डर आहेत. या वेळी त्यांनी सेक्टर 12, प्लॉट नंबर इ97, खारघर येथील घर दाखवले. या रो हाऊस करता एक कोटी वीस लाख एवढ्या रकमेची मागणी केली. त्यांच्यात एक करार झाला. या वेळी रो हाऊसचे इंटरियर करण्याकरता जैद यांनी जयराम यांच्यासोबत रो हाऊसचा तळमजला पाच वर्षांकरिता दहा लाखाच्या हेवी डिपॉझिटवर भाडे करार करून मार्च 2022 मध्ये घेतला. त्यानंतर जयराम यांनी बिल्डर व्यवसायामध्ये तोटा झाला असून त्यांच्यावर बँकेचे कर्ज असल्याने हे कर्ज फेडण्याकरता 60 लाखाची गरज असल्याचे सांगून रो हाऊसचा 60 लाख रुपयात व्यवहार करण्यास तयारी दर्शवली.
यानुसार खरेदीची रक्कम 60 लाख व स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे तीन लाख 90 हजार 800 अशी एकूण 63 लाख 90 हजार आठशे रुपये रक्कम स्वतःकडे जमा केली. 26 मार्च रोजी पनवेल रजिस्टर कार्यालयात जाऊन रो हाऊसचे पार्ट पेमेंट डीड केली. त्यानुसार 60 लाख रुपयांना सदरचा फ्लॅट घेण्याचे ठरले. हे साठ लाख रुपये जयराम यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. तसेच हेवी डिपॉझिट करता दहा लाख रुपयेदेखील जमा केले.
जयराम राय यांनी हा रो हाऊस जीपी पारसिक बँक, कळंबोली येथे गहाण ठेवून त्यावर एक कोटी 87 लाख एवढ्या रकमेचे कर्ज घेतल्याची जैद यांना माहिती मिळाली. या वेळी बँकेत जाऊन खात्री केली असता रो हाऊस बँकेमध्ये गहाण ठेवल्याचे सांगितले व अधिकची खात्री केली असता रो हाऊसचे पूर्ण कर्ज जोपर्यंत भरले जात नाही तोपर्यंत रो हाऊसची कागदपत्र प्राप्त होणार नसल्याचे बँकेतून सांगण्यात आले. या वेळी जयराम राय यांच्याकडे जाऊन कर्जफेड करून कागदपत्रे द्या असे सांगितले असता त्याने नकार दिला. त्यामुळे 70 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जयराम राय यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
RamPrahar – The Panvel Daily Paper