नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
चारधाम यात्रेतील केदारनाथ मंदिर गुरुवार (दि. 9)पासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिराचा दरवाजा सहा महिन्यांनी उघडण्यात आला आहे. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पुजार्यांनी विधिवत पूजा केली. हजारो भक्तांच्या उपस्थितीत केदारनाथाला जलाभिषेक, रुद्राभिषेक संपन्न झाला आहे.
8 तारखेला गंगोत्री आणि यमनोत्रीची दारे खुली झाल्यापासून चारधामच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. ही यात्रा सहा महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहे. शुक्रावारी बद्रीनाथ मंदिरही भक्तांसाठी खुले होणार आहे. चारधाम मंदिरांची दारे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सहा महिन्यांसाठी बंद केली जातात. एप्रिल-मेदरम्यान पुन्हा उघडली जातात. हिमवादळामुळे यात्रेच्या मार्गावर बर्फाची चादर पडली आहे. उन्हाळ्यात उत्तराखंडमध्ये चारधामच्या (गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ) यात्रेला सुरुवात होते. या चार स्थळांना हिंदू संस्कृतीत पवित्र मानले जाते. गंगा नदीचा उगम गंगोत्री आणि यमुना नदीचा उगम यमुनोत्री हे दोन्ही उत्तर काशी जिल्ह्यामध्ये आहे.
गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही चारही ठिकाणे 10000 फुटांपेक्षा अधिक उंच असल्याने विशेष काळजी घ्यावी लागते. जास्त उंचीवर भूक न लागणे, मळमळणे, डोके जड होणे असे प्रकार होतात. त्यासाठी भीमसेनी कापूर जवळ ठेवावा आणि सतत त्याचा वास घ्यावा. त्यामुळे त्रास कमी होतो. या ठिकाणांना जाताना सगळे घाटरस्ते आहेत. त्यामुळे गाडी लागू नये यासाठीच्या गोळ्या घेणे अनिवार्य ठरते, शिवाय सोबत काही प्लास्टिक पिशव्या ठेवाव्यात. गंगोत्री आणि बद्रीनाथपर्यंत गाडी रस्ता आहे, मात्र यमुनोत्री आणि केदारनाथला चालावे लागते किंवा घोड्यावरून जावे लागते. त्यासाठी रोज नियमित चालण्याचा सराव करणे गरजेचे आहे. औषधे आणि गोळ्या, चॉकलेट, टिश्यू पेपर, कोल्ड क्रीम या गोष्टी आपल्याजवळच्या पाऊच किंवा पिशवीत ठेवाव्यात. उंचावर कॅमेर्याची बॅटरी मंद होते. त्यामुळे आणखी एक बॅटरी लोकरीच्या कापडात गुंडाळून ठेवावी. पोन्चू किंवा रेनकोटसाठी वेगळी पिशवी जवळ ठेवावी. टोपी आणि गॉगल अनिवार्य आहे. आपल्यासोबत कोरड्या चटण्या ठेवाव्यात. चवबदल होण्यासाठी त्या उपयुक्त असतात. जास्तीचे कपडे कोरड्या पिशवीत घेऊन ठेवावेत, अशा सूचना भक्तांना मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.