देशाची माफी मागून प्रायश्चित्त घ्या -अश्विनी पाटील
पनवेल ः रामप्रहर वृत्त
लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी अत्यंत असंस्कृत आणि असभ्य टिप्पणी करून काँग्रेसच्या हीन संस्कृतीचे दर्शन घडविले आहे. चौधरी यांच्या या वक्तव्यास काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रोत्साहन दिल्याने देशातील महिलांचा, समृद्ध परंपरा असलेल्या आदिवासी समाजाचा आणि राष्ट्रपतिपदाचा अपमान झाला आहे. या उद्दामपणाबद्दल सोनिया गांधी, अधीर रंजन चौधरी आणि सर्व काँग्रेसजनांनी देशाची माफी मागून प्रायश्चित्त घेतले पाहिजे, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी केली. काँग्रेसकडून जोपर्यंत माफी मागितली जात नाही तोपर्यंत भाजपतर्फे जागोजागी काँग्रेसच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सुरू असलेल्या सोनिया गांधींच्या ईडी चौकशीस विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून कायदा-सुव्यवस्थेस बट्टा लावणार्या काँग्रेसजनांनी देशाच्या राष्ट्रपतींचा अपमान होत असताना मौन का बाळगले, असा सवालही त्यांनी केला.संसद अधिवेशनादरम्यान लोकसभेत गुरुवारी काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. जाणीवपूर्वक अपमान करण्याच्या उद्देशाने चौधरी यांच्याकडून हा उल्लेख होत असताना सोनिया गांधी यांनी मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वर्णवर्चस्ववादी मानसिकतेचे दर्शन घडविले आहे. सभागृहाच्या शिस्तीला आणि सभ्यतेच्या संकेतास बट्टा लावण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून वारंवार होत असतो. चौधरी यांच्या राष्ट्रपतींविषयीच्या या उद्दाम उल्लेखामुळे सभागृहाचा, राष्ट्रपतिपदाचा आणि देशाचा अपमान झाला आहे, अशी घणाघाती टीका अश्विनी पाटील यांनी केली आहे. राष्ट्रपती ुर्मू यांचा अपमान करण्यासाठी सोनिया गांधी यांनी जाणीवपूर्वक चौधरी यांना फूस लावली, असा आरोपही त्यांनी केला. सोनिया गांधी या स्वतः महिला असूनही त्यांनी महिलेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या चौधरी यांना समज दिली नाही. काँग्रेसची ही आदिवासीविरोधी व महिलाविरोधी मानसिकता उघड झाल्याने आता माफीखेरीज पर्याय नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper