प्रलंबित असलेलेल्या विषयांवर सकारात्मक चर्चा

उरण : रामप्रहर वृत्त
आमदार महेश बालदी यांनी सिडको प्रशासनासोब प्रलंबित असलेल्या विषयांबाबत बैठक घेतली. विविध समस्यांसंदर्भांतील प्रश्नांवर चर्चा करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना दिल्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये त्यांनी प्रलंबित प्रश्नांवर लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
उरण विधानसभा मतदारसंघा अंतर्गत उलवे, द्रोणागिरी व करंजाडे नोडमधील काही प्रलंबित विषयांबाबत सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा सिडको प्रशासनातर्फे या बाबतीत खूप विलंब लागत आहे. त्यापैकी खालील नमूद केलेले काही विषय हे अत्यंत महत्वाचे असून त्याबाबतीत सिडकोकडून बैठकीचे आयोजन करावे ही विनंती, असे नमुद करीत आमदार महेश बालदी यांनी विविध समस्या या निवेदनाद्वारे मांडल्या होत्या. त्याच विषयांवर बैठकीत चर्चा झाली.
यामध्ये उरण-पनवेल महामार्ग हस्तांतरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता सिडकोकडे हस्तांतरित करणे.उलवे मस्जिद विषयी, उलवे से.19 प्लॉट नं 34 (900 चौ.मी.) या भूखंडावर 300 चौ.मी दफनभूमी व 600 चौ.मी वर मस्जिद व्होण्याबाबतीत त्वरित निर्णय होणे. नवी मुंबईतील आगरी कोळी भवन व उलव्यातील भूमिपुत्र भवनच्या धरतीवर करंजाडे नोड मध्ये कराडी समाजासाठी भूखंड देणेबाबत. उरण – पनवेल तालुक्यामधील सिडको अंतर्गत येणार्या ग्रामपंचायतीच्या घन कचरा नियोजनेच्या व्यवस्थेबाबत. अशा विविध प्रश्नांकडे सिडको प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आमदार महेश बालदी यांनी बैठकीत केली. यासर्व प्रश्नांवर लवकरच कार्यवाही करण्याकडे सिडकोचा प्रयत्न असेल, असे आश्वासन सिडको एमडी यांच्याकडून देण्यात आले.
या बैठकीला आमदार महेश बालदी यांच्यासह वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, भाजप युवा नेते निलेश खारकर, शैलेश भगत, राकेश गायकवाड तसेच सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांच्यासह मुख्य अभियंता, आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper