Breaking News

देशाचा 75वा वाढदिवस साजरा करूया - आमदार प्रशांत ठाकूर

 तिरंगा फडकविण्याचे आवाहन

कर्जत : प्रतिनिधी
आपण जसा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करतो त्याप्रमाणे आपल्या देशाचा 75वा वाढदिवस साजरा करूया. आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बूथ सक्षम करण्यास सांगितले आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांनी बूथमधील 10 घरांवर तिरंगा ध्वज लावण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करून विविध सरकारी योजना त्या त्या व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी लक्ष द्यावे, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे शुक्रवारी (दि. 5) कर्जत येथे केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्याच हस्ते कर्जत शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. उद्घाटन समारंभास जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहेरे, रमेश मुंढे, संजय कराळे, उपाध्यक्ष राजेश मपारा, तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल,  सरचिटणीस राजेश भगत, किसान मोर्चा कोकण समन्वयक सुनील गोगटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, श्रीनिवास कोडरू, मंदार मेहेंदळे आदी उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला अभिमान वाटावा असे कार्य करीत आहेत. आपला पक्ष इतरांपेक्षा वेगळा आहे. अटलजी पंतप्रधान असताना त्यांनी एक महत्त्वपूर्ण योजना आणली. या योजनेला त्यांनी स्वतःचे नाव न देता पंतप्रधान सडक योजना हे नाव दिले तसेच आपल्या देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने एका आदिवासी महिलेला विराजमान केले गेले. भाजपने 2014 साली 282 जागा, तर 2019 साली 303 जागा मिळविल्या असल्या तरीसुद्धा सर्वांना बरोबर घेऊन मोदीजी काम करीत आहेत. यापूर्वी एखादी साथ आली की परदेशातून लस घ्यावी लागत असे. प्रसंगी त्यासाठी हांजी हांजी करावी लागत होती, पण मोदींजींनी लस उत्पादनासाठी अर्थसहाय्य करून कोरोनाच्या दोन लसी उपलब्ध करून दिल्या आणि त्या देशातील सर्व जनतेला मोफत दिल्या जात आहेत. आपला भारत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने काम करीत आहेत.
कर्जतमधील भाजपचे हे कार्यालय नेहमी उघडे राहून येथून लोकांची कामे झाली पाहिजेत, अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली. उपस्थितांचे स्वागत वसंत भोईर यांनी, प्रास्ताविक दीपक बेहेरे, तर सूत्रसंचालन राजेश भगत यांनी केले.
या कार्यक्रमास नगरसेवक बळवंत घुमरे, विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, बिनीता घुमरे, माजी नगरसेवक अरविंद शेलार, प्रदीप घावरे, आकाश चौधरी, राजेश चौधरी, मृणाल खेडकर, स्नेहा गोगटे, प्रकाश पालकर, शर्वरी कांबळे, श्रद्धा कराळे, दिनेश सोळंकी, मारुती जगताप आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply