मुंबई ः प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भ्रष्टाचारी हंडी फोडण्याचा क्रम सुरू झाला आहे. आम्हीसुद्धा मुंबई महापालिकेतील दहीहंडी फोडणार, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 19) येथे केला. वरळीतील जांबोरी मैदानात भाजपच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मोदींच्या नेतृत्वात आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडतोय आणि श्रीकृष्णाची हंडी यासाठी फोडतोय की यातील विकासरूपी मलईचा भाग सर्वांना मिळायला हवा. कालच आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचा साहसी खेळांमध्ये समावेश करण्याची घोषणा केली. आता तुम्ही केवळ गोविंदा पथक नाही आहात, तर खेळाच्या टीम्स आहात. तुम्हाला खेळाडूंचा सर्व दर्जा मिळणार आहे. तुमची काळजी राज्य सरकार घेणार आहे. हे तुमचे तरुणाईचे सरकार आहे. त्यामुळे आजचा दिवस तुम्हाला समर्पित करतो आणि जन्माष्टमीच्या शुभेच्छा देतो. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार दूर करायचा आहे. त्यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराचे तुकडे करण्याची ही हंडी फोडावी, असे या वेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार म्हणाले. या दहीहंडी उत्सावाला अनेक गोविंदा पथकांनी आवर्जून उपस्थिती दर्शवून आपले कौशल्य दाखविले. त्याचप्रमाणे नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.