Breaking News

दिवाळी सुटीनिमित्त मुरूड जंजिर्‍याला पर्यटकांची पसंती

मुरूड : प्रतिनिधी

दिवाळीच्या सुटीमध्ये तालुक्यातील मुरूड, काशीद,  नांदगाव समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. राजपुरी येथे जंजिरा किल्ल्याचे तिकीट काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. वीकेण्ड आणि दिवाळीची सलग पाच दिवस सुटी पडल्यापासून मुरूड तालुक्यातील समुद्रकिनार्‍यांवर पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे. मुरूड, काशीद, नांदगाव समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक दिवाळी सुटीचा आनंद घेत आहेत. शनिवारी सायंकाळपासून पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. हळूहळू सर्व लॉज फुल झाल्या. समुद्रकिनारी असणार्‍या प्रत्येक स्टॉलवर गर्दी पहावयास मिळत आहे. मुंबई, पुण्यासह औरंगाबाद, लातूर, परभणी, कल्याण, डोंबवली, विरार, दहिसर, ठाणे आदी भागातील पर्यटक येथे येत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूस पर्यटकांच्या वाहनांची गर्दी होत असून येथील हॉटेल्समध्येही पर्यटकांची गर्दी होत आहे. पर्यटकांमुळे गुरुवारी मुरूडच्या मुख्य बाजारपेठेत गर्दी झाली होती. समुद्रस्नान, बोटिंग, उंट सफारी, बनाना रायडिंग आदींचा आनंद लुटताना पर्यटक दिसत होते. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांनी गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून राजपुरी व खोरा जेटीवर येण्यास सुरुवात केली होेती, मात्र पुरातत्व विभाग जंजिरा किल्ला सकाळी 9.30 शिवाय उघडत नाही. जेटीवर तिकीट घेईपर्यंत 10 वाजतात त्यानंतर बोटीतून किल्ल्यात जावे लागते. तोपर्यंत कडक उन्ह होते. व लहान मुलांना या उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे जंजिरा किल्ला सकाळी 8 वाजता उघडावा, अशी मागणी पर्यटक करीत आहेत.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply