Breaking News

महाडमध्ये 15 विंधण विहिरीं पूर्ण; ग्रामस्थांना दिलासा

महाड : प्रतिनिधी : तालुक्यातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून 64 विंधणविहिरी खोदण्यास मंजूरी मिळाली असून, त्यापैकी 15 विंधणविहिरींची खोदाई पूर्ण झाल्याने तेथील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

महाड तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सर्व ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना असल्या तरीही पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने, या गावांना टंचाई निर्माण होते. त्यातच तालुका हा दुर्गम व वाडीवाडीत विभागलेला असल्याने या ठिकाणी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. सद्यस्थितीत तालुक्यातील 12 गावे व 56 वाड्या अशा एकूण 68 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. तर दोन गावे व 19 वाड्यांनी टँकरची मागणी केलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पाणीटंचाई तीव्र होणार आहे.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी पंचायत समितीस्तरावर पाणी पुरवठा कृती आराखडा तयार केला जातो व या आराखड्यात टंचाई दूर करण्यासाठी कायम व तात्पूरत्या स्वरुपाच्या उपाययोजना केल्या जातात. महाड तालुक्यातील अनेक गावे डोंगरात असल्याने येथे विंधणविहिरी खोदण्याशिवाय पर्याय रहात नाही. त्यानुसार महाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये 64 ठिकाणी विंधणविहिरी खोदण्यास जिल्हाधिकार्‍यांनी मंजूरी दिली आहे. तालुक्यातील अप्पर तुडील येथे दोन, पारमाची वाडी, नातोंडी बौध्दवाडी, रावढळ, गांधारपाले, दासगाव मोहल्ला येथे दोन, वरंध बौध्दवाडी, मधलीवाडी, आंबेशिवथर, सह्याद्रीवाडी, शिरवली, काचले व वामने येथे विंधणविहिरी खोदण्यात आल्या आहेत. गांधारपाले  येथील विंधणविहिरीला पाणी लागले नाही. उर्वरित ठिकाणच्या विंधणविहिरींना पाणी लागल्याने तेथील ग्रामस्थांना दिलासा  मिळाला आहे. विंधणविहिर खोदण्यासाठी ग्रामपंचायतींना 58 हजार 700 रुपयांचा निधी दिला जातो.

महाड तालुक्यात विंधणविहिरी खोदण्याचे काम युध्द पातळीवर हाती घेण्यात आले आहे. पंधरा विंधणविहिरींची खोदाई झाली असून उर्वरित विंधणविहिरींची खोदाई 15 मे पूर्वी केली जाईल.  ग्रामस्थांनी आपल्या पाण्याचे नियोजन केले पाहिजे.

– प्रमोद गोडांबे,  गट विकास अधिकारी, महाड

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply