पनवेल ः वार्ताहर
खारघर आणि कामोठे खाडीत अनधिकृत वाळू उत्खनन करणार्या वाळू माफियांवर जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांचे निर्देशनाखाली व अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांचे नेतृत्वाखाली पनवेल तहसीलदार कार्यालय आणि पोलिसांनी धडक कारवाई करीत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत आठ छोटे आणि मोठ्या बार्ज आणि दोन संक्शन पंप जप्त करण्यात आले आहेत, तर काही संक्शन पंप जागेवर नष्ट करण्यात आले आहेत. खाडीमधून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात अज्ञात वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खारघर आणि कामोठे खाडीत कोणतीही परवानगी नसताना बिनधोकपणे वाळू उत्खनन सुरू होते. अनेक वेळा तहसिलदारांनी कारवाई केली, मात्र तरीही वाळू उत्खनन सुरूच होते, मात्र या वेळच्या कारवाईने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशनाखाली अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांचे नेतृत्वाखाली पनवेल, तळोजा, खारघर खाडीमध्ये वाळू माफियांविरुद्ध सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चार मोठ्या बार्ज, चार मध्यम बार्ज व दोन छोट्या संक्शन पंपाच्या बोटी अशा दहा बोटींवर धडक कारवाई करण्यात आलेली आहे. खारघर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात सहा बार्ज, एनआरआय पोलिसांच्या ताब्यात दोन बोटी, एक बोट गाळामध्ये फसले असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आली, तर एक लहान बोट एनआरआय पोलिसांनी ताब्यात घेतली आहे, तसेच पाच संक्शन पंप नष्ट करण्यात आले आहेत. अशाप्रकारे धडक कारवाई करीत कोट्यावधींचा मुद्देमाल पाण्यामधून जप्त करण्यात आला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper