Breaking News

…तर नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी भूमिपुत्रांना संघर्ष करावा लागला नसता!

  • मंत्री रवींद्र चव्हाण यांची उद्धव ठाकरेंवर टीका
  • डोंबिवलीतील आगरी महोत्सवाचे शानदार उद्घाटन

डोंबिवली : प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देणे हा तसा छोटासा विषय होता. मनाचा मोठेपणा दाखविला असता तर भूमिपुत्रांसह आगरी समाजाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास देण्यासाठी संघर्ष करण्याची गरज भासली नसती, अशी टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केली.
आगरी युथ फोरमच्या वतीने डोंबिवलीतील ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलात 18व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी (दि. 12) मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
उद्घाटन समारंभास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार गणपत गायकवाड, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, दशरथ पाटील, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, आचार्य प्रल्हाद शास्त्री, ह.भ.प. जयेश पाटील, जर्नादन जिताडे आदी मान्यवर उपस्थित होते. फोरमच्या कणसा या स्मरणिकेचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नवी मुंबई क्षेत्रात लोकनेते दि. बा. पाटील यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यामुळे या भागातील विमानतळाला त्यांचेच नाव देणे योग्य होते. तरीही काही मंडळींनी मोठे मन केले नाही. मोठे मन केले असते तर नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा विषय चिघळला नसता. भूमिपुत्र तसेच समाजास यासाठी संघर्षही करण्याची गरज भासली नसती, असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगत उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.
नवी मुंबईत विमानतळ प्रस्तावित होताच येथील शेतकर्‍यांना साडेबावीस टक्के लाभ आणि अन्य सुविधा देण्याचे काम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, असेही ना. चव्हाण यांनी नमूद केले.
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे आगरी महोत्सव साजरा करता आला नव्हता. यंदा मोठ्या दिमाखात आणि उत्साहात हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. 19 डिसेंबपर्यंत म्हणजेच आठ दिवस हा महोत्सव चालणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply