Breaking News

सवंग प्रसिद्धीचा कावा

तब्बल चार वर्षांनंतर बॉलिवुडचा कथित बादशहा शाहरुख खान याचा चित्रपट ‘पठान’ रुपेरी पडद्यावर झळकणार म्हणून त्याच्या चाहत्यांमध्ये उत्कंठा दिसते आहे अशा आशयाच्या बातम्या गेले अनेक दिवस विशेषत: समाजमाध्यमांवर झळकत होत्या, परंतु बहुदा चित्रपटाच्या कर्त्यांना या प्रतिसादाविषयी खात्री नसावी. त्यामुळेच की काय, त्यांनी चित्रपटाच्या गाण्यात नायिका दीपिका पादुकोणला भगव्या रंगाची बिकिनी परिधान करायला लावून विवादाद्वारे सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा आधार घेतलेला दिसतो. समाजमाध्यमांची चलती आणि ओटीटी मंचाची वाढती लोकप्रियता यामुळे अलिकडे बॉलिवुडच्या थिएटरमध्ये झळकणार्‍या प्रत्येक चित्रपटाच्या निर्मात्याला प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळतील की नाही याची मोठी धाकधुक असते. एकेकाळी सुपरस्टार पद भूषवलेली खानमंडळीही याला अपवाद नाहीत. आमीर खानचा ‘लाल सिंह चढ्ढा’ तिकिटबारीवर सपशेल आपटल्यानंतर तर प्रेक्षक आता कुणाचीही गय करणार नाहीत हे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने 300 कोटीचा गल्ला कमावल्याने आता बॉलिवुडमध्ये सुपरस्टार निव्वळ ‘कंटेंट’ अर्थात दर्जेदार कथानक व निर्मितीमूल्ये हेच उरले आहेत हेही अधोरेखित झाले. या सार्‍या ताज्या पार्श्वभूमीवर बॉलिवुडचा कथित बादशहा शाहरुख खान याचा ‘पठान’ हा बहुचर्चित चित्रपट येत्या महिन्यात रीलीज व्हायचा आहे. चार वर्षांनंतर शाहरुखचा चित्रपट येणार असल्यामुळे माध्यमांनी त्याला काहिसे उचलून धरले हे खरे असले तरी प्रेक्षक तसेच करतील याची खात्री बहुदा चित्रपटाच्या निर्मात्यांना नसावी. या आठवड्याच्या प्रारंभी या चित्रपटातील गाणे ‘बेशरम रंग’ रीलीज झाले. गाण्यामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण या दोघांनीही अंगप्रदर्शनाची जणु अहमहमिका लावली आहे. अर्थात त्यातही नवीन काहीच नाही. बॉलिवुडपटांच्या गाण्यांमध्ये हे असे असतेच. आपल्या कलाकृतीमध्ये वेगळेपणामुळे प्रेक्षकांना आकर्षित करून घेण्याजोगे काही नसले की हमखास ‘कॉन्ट्रोव्हर्सी’ म्हणजे विवाद निर्माण करून सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा आधार घेतला जातो तसेच काहिसे करण्याचा प्रयत्न या ‘बेशरम रंग’ नामक गाण्यातून करण्यात आला आहे. दीपिकाने परिधान केलेली भगव्या रंगाची बिकिनी आणि ‘बेशरम रंग’ असे गाण्याचे टायटल या दोन्हीवरून वाद निर्माण झाला असून देशातील अनेक साधुसंतांनी तसेच राजकीय नेत्यांनी याला आक्षेप घेत हा ‘भगव्या’चा तसेच ‘हिंदुत्वा’चा अपमान असल्याचे म्हटले आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी यासंदर्भात खुलासा करायला हवा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांनी केली आहे. हेतुपुरस्सर आमच्या साधुसंतांच्या भावना दुखावण्याचा खोडसाळपणा कुणी करीत असेल तर खरोखरीच त्यांना जाब विचारायलाच हवा. गाण्याचे शीर्षक व नायिकेची आक्षेपार्ह वस्त्रे यात सुधारणा करून हा चित्रपट प्रदर्शित करावा, अशी मागणी मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी केली आहे. खासदार नवनीत राणा यांनीही या आक्षेपार्ह बाबींकडे सेन्सॉर बोर्डाने लक्ष द्यावे व त्या वगळून चित्रपट प्रदर्शित करावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दीपिका ही ‘टुकडे-टुकडे’ गँगची समर्थक असल्याचाही उल्लेख या बाबींना आक्षेप घेणार्‍या काही जणांनी समाजमाध्यमांवर केला आहे. एकंदर या गाण्याभोवती वाद निर्माण झाला असून बहुदा तो तसा निर्माण व्हावा म्हणूनच हेतुपुरस्सर सारी योजना केली गेली असावी असे कुणाला वाटल्यास ते स्वाभाविकच म्हणायला हवे, पण अशी सवंग प्रसिद्धी मिळवून प्रेक्षकांना थिएटरकडे वळवता येईल हा आडाखा मात्र प्रेक्षकच हाणून पाडतील.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply