अलिबाग : प्रतिनिधी
नाताळ साजरा करण्यासाठी पर्यटकांनी अलिबागला पसंती दिली आहे. अलिबाग शहर आणि आसपासच्या परिसरातील हॉटेल्स, ग्रामीण भागातील कॉटेजेसची बुकिंक फूल्ल झाली आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायिक सध्या खुश आहेत. नाताळ साजरा करण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक अलिबागला येत असतात. कोविडमुळे दोन वर्षे पर्याटक येऊ शकले नव्हते. यंदा कोविडची बंधने नाहीत. त्यामुळे पर्यटक नाताळच्या सुट्टीत बाहेर पडले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांपासून कोकणातील रायगड जिल्हा जवळ असल्यामुळे पर्यटकांनी यंदादेखील अलिबागला पसंती दिली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच अलिबाग शहरातील तसेच आसपासच्या परिसरातील हॉटेल्स् आणि कॉटेजेस् आरक्षित केले आहेत. मांडवा, आवास, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागांव, काशिद, मुरूड, दिवेआगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर हे समुद्र किनारे पर्यटकांच्या पसंतीची ठिकाणे आहेत. सुट्टीत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या समुद्र किनार्यावर आले आहेत. त्यामुळे या परिसरातील हॉटेल व्यावसायिक, कॉटेजेस यांचा धंदा सध्या तेजीत आहे. मुंबईहून सागरी सफर करीत अलिबागला पोहोचता येते. तिथून पुढे रायगडमधील अन्य ठिकाणी जाता येते. या प्रवासाची गंमत वेगळी आहे. अलिबागसह मांडवा, नागाव, काशिद, मुरूड, दिवेआगरच्या किनार्यांवर पर्यटकांची गर्दी होत आहे.
सध्या पर्यटक अलिबागला येत आहेत. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा रूमसाठी जास्त चौकशी होत आहे. कॉटेजेस महिनाभरापूर्वीच आरक्षित झाली आहेत. पर्यटक जास्त येत असले तरी आम्ही कॉटेजच्या भाड्यात वाढ केलेली नाही.
-उज्ज्वल म्हात्रे, कॉटेज मालक, वरसोली, ता. अलिबाग